कर्नाटकच्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ४६ ग्रॅम सोने, दुचाकी हस्तगत
By अझहर शेख | Published: January 9, 2024 06:47 PM2024-01-09T18:47:50+5:302024-01-09T18:47:59+5:30
३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
नाशिक : धार्मिक पर्यटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या कर्नाटकच्या एका महिला भाविकाच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकल्याची घटना द्वारका येथे गुरुवारी (दि. ४) भर दुपारी घडली होती. भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपासाला गती देत दोघा संशयित सोनसाखळी चोरांना अवघ्या पाच दिवसांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे सुमारे ११ ग्रॅम सोने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
कर्नाटक राज्यातील रहिवासी फिर्यादी सुरेश शिवा नाईक (४९) यांच्या आई नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आल्या होत्या. गुरुवारी (दि. ४) दुपारी १२.३० वाजता द्वारका सर्कल परिसरात आलेल्या असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी नाईक यांच्या आईच्या गळ्यातील १ लाख ३५ हजार रुपयांची पोत व मंगळसूत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ४) जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहायक निरीक्षक सत्यवान पवार, सतीश साळुंके, अविनाश जुंद्रे, नितीन भामरे, नीलेश विखे आदींच्या पथकाने याबाबत तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला. दोघे संशयित हे आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील नीलगिरी बाग परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पथकाला मिळाली. तेव्हापासून पथकाने या भागात दिवसरात्र सापळे रचून संशयितांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. रविवारी (दि. ७) पथकाच्या प्रयत्नांना यश आले. दोन्ही संशयित ओंकार ऊर्फ दीपक वसंत शिंदे (२३, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम), रोशन सुधाकर कटारे (२३, रा. अमृतधाम) यांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडे या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याबाबत कसोशीने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मागील तीन महिन्यांपूर्वी तपोवन रस्त्यावर झालेल्या सोनसाखळी चोरीचाही गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पवार हे करीत आहेत.
दोन गुन्हे उघड; जप्त मुद्देमाल असा...
२ लाख रुपये किमतीची ३५.८० ग्रॅमची सोन्याची लगड
५८ हजार रुपये किमतीची १०.८० ग्रॅमची सोन्याची लगड
६० हजार रुपये किमतीची पल्सर-२२० दुचाकी. असा एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल भद्रकाली पोलिसांनी जप्त केला आहे.