मंगेशकर कुटुंबासाठीची ‘मर्मबंधातली ठेव’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:18 AM2019-09-28T01:18:44+5:302019-09-28T01:19:35+5:30
सुरेल कला केंद्रा’च्या माध्यमातून १९६० च्या दशकात हृदयनाथ, मीना आणि उषा मंगेशकर संगीताचे कार्यक्र म सादर करीत होते. त्यावेळी मधुकर झेंडे यांचा मंगेशकर कुटुंबाशी परिचय झाला. त्यावेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे स्मारक कुठेच नसल्याची खंत कुटुंबीयांच्या मनात असल्याचे झेंडे यांना समजले.
सुरेल कला केंद्रा’च्या माध्यमातून १९६० च्या दशकात हृदयनाथ, मीना आणि उषा मंगेशकर संगीताचे कार्यक्र म सादर करीत होते. त्यावेळी मधुकर झेंडे यांचा मंगेशकर कुटुंबाशी परिचय झाला. त्यावेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे स्मारक कुठेच नसल्याची खंत कुटुंबीयांच्या मनात असल्याचे झेंडे यांना समजले. झेंडे यांनी तत्कालीन नगराध्यक्ष हरिश्चंद्र शेलार आणि उपाध्यक्ष गणपतराव काठे यांच्याकडे त्याबाबतचा प्रस्ताव मांडला. नगरपालिकेतील तत्कालीन धुरिणांनी या ठरावाला मान्यता देत शिवाजी उद्यानात हा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २५ एप्रिल १९६४ रोजी म्हणजे मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम मुंबईत झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी नाशिकला सर्व मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई, महाकवी कुसुमाग्रज, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर, प्रख्यात लेखक गो. नी. दांडेकर यांच्यासह लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. मंगेशकर कुटुंबीयांसाठी हा संपूर्ण सोहळा म्हणजे त्यांच्या हृदयातील ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. माई मंगेशकर यांनी तर या कार्याबद्दल मंगेशकर कुटुंबीय नाशिककरांचे सदैव ऋणी राहतील, अशा शब्दात नाशिककरांचा गौरव केला होता.
कुसुमाग्रजांचे अभिवादन
पुतळ्याच्या सल्लागार समितीत कुसुमाग्रजांचादेखील समावेश होता. त्यावेळी मास्टर दीनानाथ यांच्या पुतळ्याच्या खाली चार ओळी देण्याची विनंती महापालिकेच्या वतीने तात्यासाहेबांना करण्यात आली होती. तात्यासाहेबांनी त्यावेळी वाहिलेली शब्दसुमने ‘गीताच्या मंदिरात वसते ईश्वरतेचे मन, अशा मनाचा मानकरी हा, त्याला अभिवादन !’ या ओळी कोरण्यात आल्या. आजही त्या ओळी पुतळ्याखाली दिमाखात झळकत आहेत.
मिरजकर यांच्या घरी भेट !
त्या पुतळा अनावरण सोहळ्यानंतर लतादीदींनी नाशिकचे माजी नगराध्यक्ष आणि मास्टर दीनानाथ यांचे स्नेही रामकृष्ण मिरजकर यांच्या तिवंधा येथील घरीदेखील भेट दिली होती. त्यावेळी लतादीदींना पाहण्यासाठी तिवंधा चौकापासून भद्रकालीच्या बाजारापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा गर्दी उसळल्याची आठवणदेखील झेंडे यांनी सांगितली. मिरजकरांनी त्यावेळी काही अप्रतिम नक्षीकाम केलेले लाकडांचे तुकडे लतादीदींना दिले. त्या नक्षीकाम केलेल्या लाकडांच्या तुकड्यांचा पुढे लतादीदींनी त्यांच्या घरातील देवघराच्या रचनेत वापर केला.