मांगीतुंगीचा ‘ब’ तीर्थस्थळ क्षेत्रात समावेश
By admin | Published: December 11, 2015 11:42 PM2015-12-11T23:42:14+5:302015-12-11T23:45:13+5:30
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक : शिखर समितीने सादर केलेल्या विकास आराखड्यास मंजुरी
नाशिक : मांगीतुंगी तीर्थस्थळाचा ‘ब’वर्ग तीर्थस्थळ क्षेत्रात समावेश करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, मांगीतुंगी शिखर समितीने सादर केलेला विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि.११) नागपूर विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मांगीतुंगी विकास राज्य शिखर समितीची बैठक झाली. बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार दीपिका चव्हाण, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्यासह विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच मांगीतुंगी विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच मांगीतुंगी विकास आराखड्यानुसार १२० दिवसांत ई-निविदा पद्धतीने कामे करण्याचा कालावधी कमी करण्यात यावा, तसेच अभिषेकासाठी उदवाहक (लिफ्ट)बाबत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे, अशी चर्चा करण्यात आली. तसेच मांगीतुंगी विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याने ही कामे तत्काळ सुरू करून नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे चुंबळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिर्डी तीर्थस्थळ क्षेत्राचा सुमारे २००० कोटींचा विकास आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. हा आराखडा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, केंद्र सरकारकडून या आराखड्यास किती निधीची उपलब्धता करून देण्यात येते, हे पाहून राज्य शासन त्यासाठी निधीची तरतूद करेल, तसेच संस्थानचे १४०० कोटींचे नियोजनही या आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
या विकास आराखड्यानुसार अनेक विविध विकासकामे करण्यात येणार असून, त्यात प्रामुख्याने साईबाबा यांचे जीवनावरील संग्रहालय (म्युझियम) बनविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)