नाशिकमधून होणारी आंब्याची निर्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:31 PM2020-05-30T22:31:44+5:302020-05-30T23:51:10+5:30

जगभरात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला असून, निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या देशभर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे आंबा उत्पादकांना अनेक देशांमध्ये आंबे पाठविता आले नाहीत. ओझर येथील कार्गो विमानतळावरून होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे.

Mango export from Nashik stopped | नाशिकमधून होणारी आंब्याची निर्यात बंद

नाशिकमधून होणारी आंब्याची निर्यात बंद

Next
ठळक मुद्देलॉकडाउनचा फटका । शेतकऱ्यांचे नुकसान

नाशिक : जगभरात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला असून, निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या देशभर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे आंबा उत्पादकांना अनेक देशांमध्ये आंबे पाठविता आले नाहीत. ओझर येथील कार्गो विमानतळावरून होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे.
आंब्याचा हंगाम संपत आला तरी यावर्षी अमेरिकेत निर्यात सुरू झालेली नाही तर युरोपीय संघांमधील देशांमध्ये अवघा ५ ते ६ टन आंबा पाठविला गेला आहे. ओझर येथील कार्गो विमानतळावरून दरवर्षी अनेक देशांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. हंगाम सुरू झाल्यानंतर येथून दररोज किमान १० ते १५ टन आंबे निर्यात होत असतात युरोपमधील अनेक देशांमध्ये रत्नागिरी हापूस, दक्षिण भारतामधील बेगमपल्ली, कच्छमधील केशर आदी विविध प्रकारचा आंबा पाठविला जातो. परदेशात या आंब्याला भावही चांगला मिळत असतो.
यावर्षी जगभरात कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे अनेक देशात लॉखडाऊन असल्याने वाहतूक तसेच विमानसेवा पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे आंबा निर्यातीवर त्याचा परिणाम झाला आहे. दरवर्षी हंगामात ५०० टनापेक्षा अधिक मालाची निर्यात होत असते. यावर्षी आतापर्यंत युरोपातील विविध देशांमध्ये केवळ ५ ते ६ टन आंबा निर्यात होऊ शकली आहे. सध्या अंब्याची जी काही निर्यात सुरू आहे ती मुंबई येथून होत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. कोरोनाने अनेक आंबा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. यामुळे यंदा परकीय चलनाचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे आधीच मंदीमध्ये असलेली अर्थव्यवस्था आणखी कोलमडण्याची भीती आहे.
अमेरिका, जपान येथील निरीक्षक दरवर्षी लासलगाव येथील विकिरण केंद्रात येऊन पाहणी करतात. त्यानंतर अमेरिकेत आंबा निर्यात सुरू होते. यावर्षी कोरोनामुळे हे निरीक्षक येऊ शकले नाहीत, यामुळे अमेरिकेत अद्याप आंबा निर्यात सुरू झालेली नाही.

Web Title: Mango export from Nashik stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.