'राणेंसाठी कायपण' म्हणणारे कोकाटे राणेंच्याच वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 08:07 PM2019-09-28T20:07:01+5:302019-09-28T20:08:40+5:30
सिन्नर मतदारसंघ : पुन्हा भाजपच्या उंब:यावर प्रतीक्षा; युती झाल्यास काँग्रेस आघाडीचाही पर्याय
- धनंजय वाखारे
नाशिक : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. त्यावेळी राणेंसाठी शंभर आमदारक्या ओवाळून टाकण्याची भाषा करणाऱ्या सिन्नर मतदारसंघातील माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचीही राजकीय अवस्था सद्यस्थितीत राणेंप्रमाणेच झालेली आहे. सध्या कोणत्याच पक्षात नसलेल्या कोकाटे यांना लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता विधानसभेचे वेध लागले असले तरी राजकारणातील बदलत्या घडामोडींवरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. निवडणुकीत युती झाल्यास कोकाटे यांचे होमग्राउंड असलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अशावेळी कोकाटे काँग्रेस आघाडीची वाट धरतात की ‘एकला चलो रे’ म्हणत आव्हान देतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, युती भंग पावल्यास कोकाटेंची भाजपला तर भाजपची कोकाटेंना गरज भासणार आहे. राजकीय समीकरणे काहीही बदलली तरी या मतदारसंघात कोकाटे आणि वाजे यांच्याभोवतीच निवडणूक फिरणार आहे, हे निश्चित.
एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपात नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिल्याने भाजपकडून खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा अपेक्षाभंग झाला आणि बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरताना दारुण पराभवही पाहावा लागला. आता विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपात कोकाटे यांचे होमग्राउण्ड असलेला सिन्नर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिल्यास त्यांना कॉँग्रेस आघाडीशिवाय दुसरा पर्याय उरणार नसल्याचे चित्र आहे. यदाकदाचित युती भंग पावली तर इलेक्टिव्ह मेरिट असलेला सक्षम उमेदवार नसल्याने भाजपला पुन्हा ‘माणिक’ गावणार काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कॉँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले माणिकराव कोकाटे यांची विधानसभेत पुन्हा जाण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही आणि 1999 मध्ये त्यांनी कॉँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून उमेदवारी मिळविली. त्यावेळी त्यांनी युती सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषविणा-या; परंतु राष्ट्रवादीकडून लढलेल्या तुकाराम दिघोळे यांचा पराभव केला. 2004 मध्ये कोकाटे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेकडून उमेदवारी करत विजयश्री संपादन केली. याहीवेळेस त्यांनी तुकाराम दिघोळे यांच्यावर मात केली.
2009च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणो यांनी कॉँग्रेसची वाट धरली आणि राणो यांना राजकीय गुरु मानणारे कोकाटेही कॉँग्रेसवासी झाले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणो 2009 मध्ये कोकाटेंना कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि त्यांनी शिवसेनेचे प्रकाश वाजे यांचा पराभव करत आमदारकीची हॅट्ट्रिक साधली. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली तर कोकाटे यांनी भाजपची वाट धरत उमेदवारी केली. मात्र, वाजे यांनी कोकाटे यांचा पराभव केला.
मागील विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करलेल्या कोकाटे यांना दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न पडू लागले आणि त्यादृष्टीने त्यांनी तयारीही आरंभली. त्यांच्या दुर्दैवाने, 2019च्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युती झाली आणि भाजपकडून उमेदवारीसाठी दावा ठोकणा-या कोकाटे यांचा अपेक्षाभंग झाला. मात्र, दिल्ली गाठण्याची महत्त्वाकांक्षा कायम राहिल्याने कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत आव्हान देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत कोकाटे यांनी त्यांच्या सिन्नर मतदारसंघात सर्वाधिक 91 हजार 114 मते घेतली तर शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे 56 हजार 676 मते घेऊन दुस-या क्रमांकावर राहिले. 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत कोकाटे यांच्या मताधिक्यातही सुमारे सात हजार मतांनी वाढ झाली.
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करूनही शिवसेनेपेक्षा जास्त मते घेणा-या कोकाटे यांचा आत्मविश्वास आणखी दुणावला आणि त्यांना आता विधानसभा निवडणूक खुणावू लागली आहे. मात्र, उमेदवारीसाठी कोणत्या पक्षाचा ङोंडा हाती घ्यायचा ह्या त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक युतीकडूनच होण्याची शक्यता आहे. युती झाल्यास अपेक्षेप्रमाणो सेनेकडेच जागा राहणार आहे. त्यामुळे कोकाटे यांना पुन्हा कॉँग्रेस आघाडीचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत. युती न झाल्यास भाजपलाही सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे. हा शोध पुन्हा कोकाटे यांच्याभोवती थांबण्याची शक्यता आहे. युती होवो ना होवो, सिन्नर मतदारसंघात कोकाटे-वाजे अशीच लढत बघायला मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.