वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारेची सुवर्णपदकाला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 05:21 PM2022-10-28T17:21:28+5:302022-10-28T17:22:17+5:30
आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या आकांक्षाने तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले.
अशोक बिदरी
मनमाड - उत्तरप्रदेशमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडियाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडची आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने उत्तम कामगिरी केली. या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत तिने तीन नवीन राष्ट्रीय विक्रमासह स्वतःचेच विक्रम मोडीत काढून सुवर्णपदकाला गवसणी घातली.
उत्तरप्रदेशच्या मोदीनगर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिने इतिहास रचत खेळात उत्तम कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या आकांक्षाने तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. आज सुरू झालेल्या महिला रँकिंग राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४० किलो वजनी गटात तिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत स्नॅच मध्ये ६० किलो वजन उचलून स्वतःचाच ५९ किलोचा विक्रम मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. तसेच क्लिन जर्क मध्ये ७१ किलो वजन उचलून पुन्हा एकदा स्वतःचाच ७० किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रमासह एकूण१३१ किलोचा नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित करून तीन नवीन राष्ट्रीय विक्रम करत स्पर्धेतील सुवर्णपदक मिळविले आहे तिने रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक देखील पटकावून महाराष्ट्रासाठी विजयी सुरवात केली आहे. पतियाळा भुवनेश्वर व आता मोदीनगर येथे नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावून हॅट्ट्रिक साजरी केली.
आकांक्षाला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक रमेश थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. एस. एस. पोतदार, गुरुगोविंद सिंग हायस्कुलचे अध्यक्ष बाबा रणजितसिंग, प्राचार्य सदाशिव सुतार, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, सचिव प्रमोद चोळकर, भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.