मनमाडला कांद्याप्रश्नी शेतकऱ्यांचा रस्तारोको
By admin | Published: December 16, 2015 10:56 PM2015-12-16T22:56:20+5:302015-12-16T22:57:14+5:30
मनमाडला कांद्याप्रश्नी शेतकऱ्यांचा रस्तारोको
मनमाड : गेल्या काही दिवसांपासून काद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे आज बुधवारी मनमाड येथे संतप्त शेतकऱ्यांनी रस्तारोको आंदोलन केले. कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.
मनमाड बाजार समीतीमधे आज सकाळी कांद्याच्या लिलावाला सुरवात झाली.आवक कमी असतानाही कांद्याला किमान सातशे रुपये तर कमाल अकराशे रुपये व सरासरी नउशे रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला.अन्य बाजार समितीच्या तुलनेत मनमाड बाजार समितीमधे कमी भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.त्या नंतर संतप्त शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पुणे इंदूर महामार्गावर मालेगाव चौफुलीकडे वळवला. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घोषणा शेतकरी देत होते.
मालेगाव चौफुलीवर शेतकऱ्यांनी ठिया मारून रस्तारोको आंदोलन सुरू केले.या वेळी कांद्याला हमी भाव मिळावा अशा घोषणा देण्यात आल्या.या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.कांद्याचे निर्यातमुल्य कमी करण्यात आले असले तरी कांद्याच्या भावात फारशी वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून निर्यात मुल्य शुन्य करण्यात यावे अशी मागणी केली. या आंदोलनामुळे प्रशासनाची दमछाक झाली.प्रशासनाकडून समाधानकारक अश्वासन मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)