चोरीचा ऐवज वाटपावरून मनमाडला गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:47 AM2018-08-04T01:47:14+5:302018-08-04T01:47:34+5:30
मनमाड : धुळे येथील डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींमध्ये आपापसात चोरीचा ऐवज वाटपातून झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मनमाड शहरातील भगतसिंग मैदानात घडली. भल्या पहाटे घडलेल्या या थरार नाट्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. जखमी आरोपींचा जबाब घेण्यासाठी मनमाड येथील पोलीस पथक धुळे येथे रवाना झाले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मनमाड येथील भगतसिंग मैदान परिसरात राहणारे सागर मरसाळे, विनोद मरसाळे व त्यांचा येवला येथील मामेभाऊ गुरू भालेराव यांनी गुरु वारी रात्री धुळे येथे एक डेअरीचे शटर तोडून ३२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले. एक दुचाकीवर हे संशयीत आरोपी मनमाड कडे निघाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच धुळे पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली. हे आरोपी नाशिककडे निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नाशिक पोलिसांना माहिती देऊन धुळे पोलीस या आरोपीच्या मागावर होते.
इकडे मनमाड येथे पोहोचल्या नंतर भगतसिंग मैदान परिसरातील एका घराच्या छतावर चोरट्यांनी चोरून आणलेल्या ऐवजाचे वाटप सुरू केले. चोरीचा ऐवज वाटणीवरून त्यांच्यात आपापसात वाद झाला. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने सागर मरसाळे व विनोद मरसाळे यांनी त्यांचा जोडीदार गुरु भालेराव याच्यावर गोळी झाडली. जखमी झालेल्या भालेराव याने आरडाओरडा केला.
या घटनेची माहिती मिळताच मनमाडचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मागावर असलेले धुळे येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. धुळे पोलिसांनी जखमी भालेराव व सागरला ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार झाला आहे. पोलीस दोन्ही आरोपींना धुळे येथे घेऊन गेले आहे. गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या आरोपीवर धुळे येथे उपचार सुरू आहे.
पोलीस पथक धुळे येथे रवाना
जखमी आरोपीचा जबाब नोंदवून घेण्यासाठी मनमाड पोलीस पथक धुळे येथे रवाना झाले आहे. त्याच्या फिर्यादीवरून मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हे तिन्ही आरोपी अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर मनमाड लोहमार्ग पोलिसात अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते.