मनमाडला किरकोळ वाद सोडता ९८.३५ टक्के झाले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2023 06:56 PM2023-04-30T18:56:20+5:302023-04-30T18:56:51+5:30

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान किरकोळ बाचाबाची सोडता शांततेत पार पडले.

manmad got 98 35 percent voter turnout barring minor controversy | मनमाडला किरकोळ वाद सोडता ९८.३५ टक्के झाले मतदान

मनमाडला किरकोळ वाद सोडता ९८.३५ टक्के झाले मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,  संजय मोरे, मनमाड (नाशिक): मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी संचालक मंडळाच्या  निवडणुकीचे मतदान रविवार (ता. ३०) किरकोळ बाचाबाची सोडता शांततेत पार पडले. ग्रामपंचायत, सोसायटी, व्यापारी व हमाल मापारी या चार गटातील एकूण ७८७ पैकी ७७४ मतदारांनी चार मतदान केंद्र व चार बुथवर मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९८.३५  टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी सांगितले. 

सकाळी मनमाड - येवला महामार्गावर असलेल्या संत झेवियर्स हायस्कूलमध्ये चार मतदान केंद्रावर आठला मतदानाला सुरवात झाली. १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलचे १८, परिवर्तन पॅनलचे १८ तर ५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत  ३७.६१ टक्के मतदान झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत ८६.७८ टक्के मतदान झाले. दुपारी तीन नंतर शुकशुकाट होता. किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सिद्धार्थ मोरे, प्रांताधिकारी श्री देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी समरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

एकूण ७८७ मतदारांपैकी ७७४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. सोसायटी गटच्या ११ जागांसाठी २९५ मतदारांपैकी २९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत गट ४ जागांसाठी २१० मतदारांपैकी २१०  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. व्यापारी गटाच्या २ जागांसाठी १४७ मतदारांपैकी १४१ मतदारांनी मतदान केले. हमाल मापारींच्या १ जागेसाठी १३५ पैकी १३२  मतदारांनी मतदान केले.  दोन्ही पॅनलमध्ये काटेकी टक्कर झाली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व करणारे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करून शासकीय विश्रामगृहावर तळ ठोकून बसले होते.  माजी खासदार समीर भुजबळ हेही रामकुंज बंगल्यावर तळ ठोकून होते. परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करणारे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने चांगलेच आव्हान उभे केले. मनमाड बाजार समितीत आमदार सुहास कांदे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

आज ( सोमवारी ) मतमोजणी ....

 सोमवारी दि.१ रोजी सकाळी ११ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. त्यासाठी सुसज्ज हॉलमध्ये ३ टेबल लावण्यात आले आहेत. या तीन टेबलवर सुरूवातीला हमाल मापारी व व्यापारी, दुसऱ्या गटांत ग्रामपंचायत आणि तिसऱ्या गटांत सोसायटी मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण होईल. जवळपास २० अधिकारी, कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. मुख्य मतदान केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पुरेसा व चोख बंदोबस्त तैनात केल्याची माहिती डॉ.मोरे यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: manmad got 98 35 percent voter turnout barring minor controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.