मनमाडला महावितरणच्या अधिकाऱ्यांची मनमानी
By admin | Published: February 19, 2017 01:12 AM2017-02-19T01:12:16+5:302017-02-19T01:12:27+5:30
नागरिकांत संताप : व्यापारी महासंघाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
मनमाड : येथील महावितरण वीज कंपनीकडून कुठलीही पूर्वसूचना न देता वीज मीटर जप्त करणे, जोडण्या तोडणे तसेच अधिकारीवर्गाच्या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या शहरातील व्यापारी महासंघाने महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन आपल्या तक्रारींचे निवेदन दिले. नोटाबंदीनंतर देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, त्याचा परिणाम मनमाड येथील बाजारपेठेवर झाला आहे. आर्थिक मंदीचा सामना करत असलेल्या मनमाड शहरातील व्यापारीवर्गाला वीज वितरण कंपनीकडून सहकार्य करण्याऐवजी वेठीस धरण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. कंपनीकडून कुठलीही पूर्वसूचना न देता अशोभनीय भाषा वापरून वीज मीटर काढून घेण्यात येत आहे. थकबाकी एकरकमी भरण्याचा आग्रह व्यापारीवर्गाला केला जात आहे. यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच पूर्वसूचना न देता वीजजोडणी बंद करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रविवारी कार्यालयात कुणीही कर्मचारी वा अधिकारी उपस्थित राहात नसून कार्यालयातील दूरध्वनी नेहमी व्यस्त असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याची गंभीर दखल न घेतल्यास व्यापारी महासंघाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, राजकमल पांडे, दादा बंब, ज्येष्ठ सुरेश लोढा, मनोज जंगम, रइस फारुकी, सचिन लुणावत, सचिन संघवी, संजय वास्कर, मनोज आचलिया, नीलेश व्यवहारे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)