मनमाड - इगतपुरी रेल्वे मार्ग कसारापर्यंत नेण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:50+5:302021-07-31T04:15:50+5:30

दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशन काळात खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेऊन रेल्वे ...

Manmad - Igatpuri railway line to Kasara | मनमाड - इगतपुरी रेल्वे मार्ग कसारापर्यंत नेण्याचा विचार

मनमाड - इगतपुरी रेल्वे मार्ग कसारापर्यंत नेण्याचा विचार

googlenewsNext

दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशन काळात खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेऊन रेल्वे लाईनसंदर्भात चर्चा केली. मनमाड - नाशिक - इगतपुरी दरम्यान नव्याने रेल्वे लाईन टाकण्यात येत आहे. तसेच कल्याण ते कसारा या दरम्यानदेखील रेल्वेकडून एक नवी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. नाशिक ते मुंबई रेल्वेने जवळपास १८० किलोमीटर अंतर आहे. मात्र, कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या घाट, डोंगर दऱ्यांच्या रस्त्यात रेल्वेला वाहतुकीला अनेक अडचणी येतात. यासाठी कसारा ते इगतपुरी दरम्यान रेल्वे इंजिनला अतिरिक्त इंजिन (बँकर) लावले जातात. त्यामुळे घाटातील चढाव पार करण्यात येतो. मात्र, यामुळे वेळ व रेल्वेचा पैसा खर्च होताे. आता रेल्वे मार्ग नव्याने जोडणी करणे सोयीचे झाले आहे. रेल्वे मार्गावर टनेल बनविणे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे सोयीचे झाले आहे. त्यामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान बोगदा करणे, त्याचा डायमीटर वाढविणे तसेच उंचावरून वेगवान रेल्वे वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान नव्याने रेल्वे लाईनची जोडणी करून नाशिक - मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करता येणार आहे.

नाशिक - मुंबई दरम्यान रेल्वे प्रवासात राजधानी एक्स्प्रेसला केवळ सव्वा दोन तास लागतात. मात्र, पंचवटी एक्स्प्रेसला जवळपास पावणे चार तासांचा वेळ लागतो. जर ही रेल्वेलाईन इगतपुरी - कसारा दरम्यान टाकण्यात आली तर घाट परिसरात रेल्वेला लागणाऱ्या अतिरिक्त वेळेची बचत होईल. यासंदर्भात सविस्तर माहिती गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दिली. दानवे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच रेल्वे मंत्रालयाच्या एका विशेष पथकाकडून कसारा ते इगतपुरी दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पाहणी करण्यात येणार असून, यासंदर्भातला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार या नव्या लाईन टाकण्याच्या कामाला मंजुरी देऊन रेल्वे मार्ग टाकण्याला सुरुवात करण्यात येईल.

-------------

Web Title: Manmad - Igatpuri railway line to Kasara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.