देवगाव परिसरात कोंबड्यांवर मानमोडीचा रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:58 PM2021-05-04T23:58:09+5:302021-05-05T00:45:00+5:30
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना आता कोंबड्यांवर संकट उभे ठाकले असून, कोंबड्यांतील मानमोडी ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना आता कोंबड्यांवर संकट उभे ठाकले असून, कोंबड्यांतील मानमोडी रोगाच्या प्रादुर्भावाने सात ते आठ कोंबड्या दगावल्या आहेत. उष्णतेच्या अधिक तीव्रतेमुळे हा प्रादुर्भाव वाढला असून, मानमोडी संसर्गजन्य रोग असल्यामुळे इतरही कोंबड्यांना त्याची बाधा झाल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या उष्णतेच्या तीव्रतेने व कॅल्शिअम, फॉस्फरस आणि "ड' जीवनसत्त्व यांची कमतरता किंवा असंतुलितता, चुकीचे खाद्य मिश्रण, आणि इतर काही आजार ज्यामध्ये हाडांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि "ड' जीवनसत्त्व यांच्यावर होणारा परिणाम आदी कारणांनी मानमोडी रोगाचा परिणाम कोंबड्यांवर दिसून येतो. तसेच चांगली शरीरयष्टी असणाऱ्या व जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्यांत या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन अचानक कमी होते. मरतुकीचे प्रमाण हे २ ते १० टक्के एवढे असते. उष्ण हवामान, तणाव यामध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते. या आजाराची बाधा झालेल्या कोंबड्यामध्ये झुंगण्याचे प्रमाण वाढून शेवटी कोंबड्या मृत पावतात.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात कोरोना महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात फोफावत असताना कोंबड्यावरही मानमोडी महामारीचे संकट ओढावले असून, सात ते आठ कोंबड्या या रोगाला बळी पडल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून याबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.
तापमानातील वाढलेल्या उष्णतेचा कोंबड्यावर परिणाम होत असून चुकीचे खाद्य मिश्रणाने कोंबड्यावरील मानमोडी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करून रोगराई नियंत्रणात आणली जाईल.
- डॉ. विजय भोये, पशुधन अधिकारी, देवगाव
फोटो - ०४ देवगाव बर्ड
देवगावमध्ये मृत पावलेल्या कोंबड्या.