मनोज जरांगे पाटील यांचा 'सेम टू सेम' नाशिकच्या आंबोलीत; संतोष मेढेने वेधले लक्ष
By धनंजय वाखारे | Published: November 24, 2023 10:42 AM2023-11-24T10:42:36+5:302023-11-24T10:45:32+5:30
मनोज जरांगे पाटील हे नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे येऊन गेले. त्यांची मोठी सभा देखील झाली.
नाशिक : आरक्षणाच्या लढाईमुळे सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. सर्वतोमुखी जरांगे पाटील हेच नाव चर्चेत आहे तर दृश्य माध्यमातून जरांगे यांनाच सर्वाधिक स्क्रीन टाइम मिळतो आहे. जरांगे पाटील यांची क्रेझ तरुणाईत प्रचंड वाढली असतानाच त्यांचे डुप्लिकेटही समोर येऊ लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथील संतोष दिनकर मेढे हा त्यापैकीच एक. संतोष अगदी हुबेहूब जरांगे पाटील यांच्या सारखा दिसत असल्याने तो सुद्धा या प्रतिरूपामुळे प्रसिद्धीस आला आहे.
मनोज जरांगे पाटील हे नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे येऊन गेले. त्यांची मोठी सभा देखील झाली. या सभेतच संतोष मेढे हा तरुण देखील आकर्षण ठरला. अगदी जरांगे पाटील यांच्यासारखी शरीरयष्टी, केसांची स्टाईल आणि अर्धवट पांढरी दाढी, बोलण्याची लकब, गळ्यात भगवा शेला यामुळे संतोषने लक्ष वेधून घेतले. सभास्थळी अनेकांनी त्याच्याबरोबर देखील फोटो काढून घेतले. संतोष हा सामान्य मराठा शेतकरी कुटुंबातील युवक आहे. आंबोलीत तो आपल्या दीड एकर जमिनीत शेती करतो.
दहावी शिकलेल्या संतोषचे बोलणंही ग्रामीण ढंगातील आहे. त्याच्या गावातील ग्रामस्थांनी संतोष हा सेम जरांगे पाटील यांच्या सारखा दिसतो हे हेरले आणि त्याला त्र्यंबकेश्वरला जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी घेउन गेले परंतु गर्दी मुळे त्याला जरांगे पाटील यांची भेट काही घेता आली नाही पण जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी संतोषला जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी थेट आंतरवाली सराटीला येण्याचे निमंत्रण दिले आहे.
जरांगे दादांचा विचार पुढे नेणार
मी हुबेहूब जरांगे दादांसारखा दिसतो हे समजल्यावर मलाही आनंद झाला. जरांगे दादा यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या लढाईत मी देखील काम करणार आहे. दादांच्या प्रतिमेला कोणताही धक्का पोहोचणार नाही याची दक्षता घेईल.
- संतोष मेढे, आंबोली