जरांगे यांच्या साल्हेर दौऱ्यात घातपाताच्या आरोपांचे खंडन; अनुतिच प्रकार घडला नसल्याचा पोलिसांचा दावा
By धनंजय वाखारे | Published: February 10, 2024 06:55 PM2024-02-10T18:55:35+5:302024-02-10T18:56:03+5:30
घातपात करण्याचा कट रचला असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी शनिवारी केला.
सटाणा (नाशिक): बागलाण तालुक्यातील साल्हेर येथील दौऱ्यावर असताना आपल्या ताफ्यात पिकअप घालून घातपात करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दस्तुरखुद्द मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी (दि.१०) केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मात्र, अशी काही घटनाच घडली नसल्याचा दावा जायखेडा पोलिसांनी केला आहे. गेल्या गुरुवारी (दि.८) मराठा आंदोलक मनोज जरांगे बागलाण दौऱ्यावर असताना रात्री साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू आणि साल्हेर किल्ल्याचे किल्लेदार स्व. सूर्याजी काकडे यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आले होते.
या दरम्यान जरांगे यांच्या ताफ्यात पिकअप गाडी घालून घातपात करण्याचा कट रचला असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी शनिवारी केला. याबाबत आपण स्थानिक पोलिसांना चौकशी करण्याचेही सांगितल्याचे जरांगे म्हणाले आहेत. त्यानुसार जायखेडा पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती घेतली असता अशी कोणतीही घटना त्या ठिकाणी घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्या रात्री या रस्त्याने मजूर वाहून नेणारी पिकअप गाडी जात होती मात्र ती गाडी ताफ्यापासून लांब अंतरावर उभी केल्याचे सांगितले जात आहे.
मनोज जरांगे हे साल्हेर येथे येणार असल्यामुळे आधीच चोख बंदोबस्त ठेवला होता. सूर्याजी काकडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन जरांगे सुखरूप परतले. या दौऱ्यात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. - पुरुषोत्तम शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक