मानूरच्या कन्येने शेतात फुलवला हिरवागार मळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:01+5:302021-06-06T04:11:01+5:30
कळवण : सुयोग्य नियोजन, अथक परिश्रम आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांना मेहनतीची जोड देत तीस एकर क्षेत्रात विविध प्रकारची फळझाडे आणि ...
कळवण : सुयोग्य नियोजन, अथक परिश्रम आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांना मेहनतीची जोड देत तीस एकर क्षेत्रात विविध प्रकारची फळझाडे आणि शेतीपिकांचे उत्पादन यशस्वीरित्या घेत कळवण तालुक्यातील मानूर येथील श्रीलेखा पाटील यांनी आपल्या कल्पकतेतून शेती फुलविली आहे. पारंपरिक शेतीसोबतच शेतात वेगळे प्रयोग राबवित शेतकऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे.
मानूर येथील डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कन्या असलेल्या श्रीलेखा पाटील यांनी आपल्या मानूर शिवारातील शेतीत उत्कृष्ट नियोजन करीत वेगवेगळी पिके घेतली असून एक महिला आपल्या अचाट बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाच्या बळावर उत्तमप्रकारे नियोजन करून शेती विकसित करू शकते याचे उदाहरण पाटील यांनी दाखवून दिले आहे. पाटील यांनी दोन एकर क्षेत्रात केशर आंब्याची रोपे लावली असून चांगल्या प्रकारे नियोजन केल्याने आंबा मोठ्या प्रमाणात बहरला आहे. त्यांनी खपली गव्हाचा प्रयोगही शेतात केला असून ह्या गव्हाचे उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात घेतले जाते. खपली गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे तो काढणीनंतरही टणक अशा टरफलात असतो. बियाणे म्हणूनही तो टरफलासहीत वापरला जातो. काही क्षेत्रात आद्रक लागवड करण्यात आली असून आल्याचेही उत्पादन घेतले जात आहे. तर केळी लागवडीचाही प्रयोग पाटील यांनी केला असून तो यशस्वी झाला आहे.
इन्फो
दोन हजारांहून अधिक झाडे
श्रीलेखा पाटील यांनी आपल्या शेताच्या बांधावर, कडेला सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून विविध झाडांची लागवड केली असून हिरव्यागार झाडीने हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य झाला आहे. श्रीलेखा पाटील यांचा कृषी क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग करण्याचा प्रयत्न राहिला असून सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. पाटील या सोलापूर जिल्ह्यातील श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पत्नी आहेत. श्रीलेखा पाटील ह्या संस्थेच्या सचिव असून माळशिरस तालुक्यातील पाणिवच्या सरपंचदेखील आहेत.
कोट....
वडील डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून आम्ही शेतीत वेगवेगळे प्रयोग राबविले असून केशर आंबा, पेरू, केळी अशा फळांसोबतच खपली गहू, आद्रक या पिकांचे उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच नाविन्यता जोपासली, त्याचा निश्चित फायदा होईल.
- श्रीलेखा पाटील, मानूर
फाेटो- ०५ श्रीलेखा पाटील मानूर
===Photopath===
050621\05nsk_6_05062021_13.jpg
===Caption===
फाेटो- ०५ श्रीलेखा पाटील मानूर