ग्रामस्वच्छतेत नांदूरशिंगोटे गटात मानोरी ग्रामपंचायत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:52 PM2019-09-17T18:52:58+5:302019-09-17T18:54:58+5:30
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९ मध्ये सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे जिल्हा परिषद गटातून मानोरी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नांदूरशिंगोटे: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९ मध्ये सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे जिल्हा परिषद गटातून मानोरी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सिन्नर येथील नर्मदा लॉन्स येथे पार पडलेल्या सरपंच परिषद कार्यक्रमात गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, पंचायत समिती सदस्य शोभा बर्के, वेणुबाई डावरे, सरपंच रामदास चकणे, ग्रामसेवक एस.के. सानप, ग्रामपंचायत कर्मचारी रवी पवार यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यांनी आपला मूलभूत हक्क म्हणून तो बजवावा. आपला परिसर व गाव स्वच्छ ठेवले तर आपण खऱ्या अर्थाने देशसेवा व आपल्या माणसांना रोगापासून मुक्त ठेवण्यासाठी केलेला प्रामणिक प्रयत्न आहे असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केले. मिळालेला पुरस्कार हा प्रत्येक नागरिकाचा असून, स्वच्छता ही अविरत चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगत अशाच पद्धतीने गावातील स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सरपंच चकणे यांनी केले. यावेळी उपसरपंच सविता नवले, सदस्य अशोक लहानू म्हस्के, नितीन अशोक पवार, बाळासाहेब सानप, ज्ञानेश्वर सानप, अलका बाळासाहेब म्हस्के, सुनीता कर्डेल, चंद्रकला आहिरे, ताराबाई सानप, मीरा सानप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.