मनपास साग्रसंगीत पार्टी झाली, कोणी नाही पाहिली...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:01+5:302021-05-27T04:15:01+5:30
महापालिकेत तशा अनेक अजिबोगरीब घटना घडतात. किंबहुना अशा घटनांचे ते भांडारच आहे. त्यात गेल्या पंधरवड्यापूर्वी घडलेली घटना चांगलीच चर्चेत ...
महापालिकेत तशा अनेक अजिबोगरीब घटना घडतात. किंबहुना अशा घटनांचे ते भांडारच आहे. त्यात गेल्या पंधरवड्यापूर्वी घडलेली घटना चांगलीच चर्चेत आली. विधिमंडळाच्या धर्तीवर बांधलेल्या राजीव गांधी भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर व्हरांड्यातच साग्रसंगीत पार्टी झाल्याची चर्चाच पसरली नाही तर त्याठिकाणी बाटली आणि ग्लासेसचे पुरावेही सापडले म्हणे. सध्या ‘बार’ बंद असले म्हणून काय झाले, महापालिकेच्या मुख्यालयात थोडीच पार्टी करता येईल? आयुक्तांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे तसे शोध घेण्यात खूप माहीर मानले जातात. महापालिकेला माहित नसलेले अनेक जीआर त्यांना माहित असतात. तसेच मंत्रालयापर्यंत त्यांचे हात पोहोचले असल्याचेदेखील चर्चेत असते. साहजिकच ‘लंबे हाथ’ असलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी झाडून कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली आणि त्याच दिवशीचे नव्हे; तर तब्बल यामागील पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले, परंतु ग्लास आणताना, पार्टी करताना काहीही निष्पन्न झाले नाही. पुरावे सापडल्याने पार्टी झाली. पण, कोणी केली तेच चौकशीत आढळले नसल्याने प्रशासन बुचकाळ्यात पडले आहे.
इन्फो....
भुताटकी झाली...?
महापालिकेच्या राजीव गांधी भवनात काय होईल, याचा नेम नाही. आत्ता आत्ता निवडून आलेल्या आणि प्रशासनात कारभारी झालेल्यांना त्याबद्दल काही माहिती नाही. मात्र, मंत्र तंत्र बरेच झाले. टेबल खूर्च्यांच्या दिशा बदलून झाल्या. मध्यवर्ती चौकातील कारंजाच्या भोवती वेगवेगळ्या रंगाचे दिवे बसवून त्यांचे फाेकस वेगवेगळ्या विभागांवर टाकून झाले आहेत. कदाचित त्यावेळी अशा तोडग्यांमुळे बंद झालेली भूताटकी आता पुन्हा सुरू झाली काय, असाही प्रश्न केला जात आहे.