मनसापुरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:31+5:302021-09-03T04:14:31+5:30
नांदूरशिंगोटे : येथील मठात मनसापुरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिराच्या प्रांगणात मंगळवारपासून तीन ...
नांदूरशिंगोटे : येथील मठात मनसापुरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिराच्या प्रांगणात मंगळवारपासून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून येथील मनसापुरी महाराज मंदिराचा कायापालट करण्यात आला. मंदिराच्या कलशावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून तीन दिवस कीर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी मूर्तीची अभिषेक व पूजा करण्यात आली. बुधवारी सकाळी यज्ञ कुंड होऊन होम हवन करण्यात आले. त्यानंतर दहा वाजता गावातून मनसापुरी महाराज मूर्तीची मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत गावातील महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भीमाशंकर येथील गोरक्षनाथ आखाडाचे महंत बालयोगी गणेशनाथ महाराज व निफाड येथील शिवगिरी महाराज यांच्या उपस्थितीत मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. ह.भ.प. गायनाचार्य गणेश महाराज शिंदे उदापुरकर, अंबादास महाराज बुरुडे (पनवेल) यांचे कीर्तन पार पडले. गुरुवारी (दि.२) रोजी सकाळी दहा ते बारा वेळेत भागवताचार्य नवनाथ महाराज शेलार (चांदवड) यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील वारकरी संप्रदाय, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले.
--------------------
नांदूरशिंगोटे येथे मनसापुरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमप्रसंगी शोभायात्रेत सहभागी झालेले भाविक. (०२ नांदुरशिंगोटे)
020921\02nsk_16_02092021_13.jpg
०२ नांदुरशिंगोटे