वाड्या-वस्त्या ओस, मजुरांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 04:41 PM2018-10-29T16:41:43+5:302018-10-29T16:41:52+5:30
दुष्काळजन्य स्थिती : रोजगाराच्या शोधार्थ कुटुंबीयांची धावपळ
खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे दुष्काळज्यन परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होत असून त्यामुळे ठिकठिकाणी वाडी-वस्ती ओस पडू लागल्या आहेत.
चालू वर्षी देवळा तालुक्यात अल्पशा पावसामुळे आतापासून भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पुढे कामे राहणार नाहीत म्हणून या वर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी मजुरांचे स्थलांतर होताना दिसून येत आहेत. परिसरात यापूर्वी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते असे. त्यामुळे गावातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध होत असे. परंतु या वर्षी अगदी अल्पशा पावसामुळे नदी-नाल्याना पुराचे पाणी आले नाही .त्यामुळे धरणे व नाला बांध भरले नाहीत. परिणामी, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्यामुळे विहिरींना पाणी नाही. रब्बी हंगामातील पिकांची लागवड करता येणार नसल्याने रोजगारही उपलब्ध होणार नाही . खामखेडा परिसरातून दर वर्षी काही प्रमाणात आदिवासी लोक थोडया प्रमाणात ऊस तोडणीसाठी बाहेरील राज्यातील कारखान्याकडे जात असतात. त्यात काही लोक अहमदनगर, पुणे, बारामती, कोल्हापूर ,सातारा, जिल्ह्यासह गुजरात,व मध्यप्रदेश प्रांतात जातात. आता दुष्काळी स्थितीमुळे संसारासाठी लागण्याऱ्या वस्तू घेऊन बैलगाडयांसह ट्रकद्वारे मजुरांचे स्थलांतर होताना दिसून येत आहे. सकाळ सायंकाळी फुलून दिसणाºया गावातील आदिवासी वस्ती वाड्यावर आता मात्र वयोवृद्ध व लहान मुलेच दिसून येत असल्याने वाडी,वस्त्या ओस पडत चालल्या आहेत.