मनसे नगरसेवकांची टूर कात्रजला
By admin | Published: January 12, 2015 12:17 AM2015-01-12T00:17:41+5:302015-01-12T00:17:57+5:30
ध्यास नवनिर्माणाचा : बायोगॅसप्रकल्पासह केली नावीन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी
नाशिक : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला मतदारांनी कात्रजचा घाट दाखविल्यानंतर पुन्हा नव्याने उभारी घेण्याची धडपड मनसेने चालविली असून, ताब्यात असलेल्या एकमेव अशा नाशिक महापालिकेच्या माध्यमातून नवनिर्माणाचा ध्यास घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापौर, स्थायी समिती सभापतींसह मनसेच्या सदस्यांनी पुणे महापालिका हद्दीतील कात्रज भागाची सहल
काढत बायोगॅसप्रकल्पासह काही नावीन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी केली. नाशकातही कात्रजच्या धर्तीवर बायोगॅस प्रकल्प राबविता येईल काय, याबाबतचा विचार आता केला जाणार असून, राज ठाकरे यांच्या आगामी दौऱ्यात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यांत तीनदा नाशिक दौरा करत आपल्या मनातील संकल्पनांना चालना देण्याच्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे यांनी नाशिकला गार्डन सिटी बनविण्याचा संकल्प सोडला आहेच शिवाय काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचाही ध्यास घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेच्या २५ ते ३० नगरसेवकांसह महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती राहुल ढिकले आणि गटनेते अशोक सातभाई यांची दोन दिवसांची सहल पुण्याजवळील कात्रज या ठिकाणी शनिवारी रवाना झाली होती.
कात्रज याठिकाणी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या स्वत:च्या प्रभागात बायोगॅस प्रकल्प उभा केला आहे. २०११ साली सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पापासून वीजनिर्मिती केली जाते. सदर प्रभागातील नागरिकांकडून घरटी ३० रुपये जमा केले जातात. त्यासाठी संस्थांकडून प्रत्येकाला ओला व सुका कचरा अलग करण्यासाठी दोन डसबीन देण्यात आल्या आहेत. जमा झालेल्या ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाते. सदरच्या विजेचा वापर जवळच असलेल्या उड्डाणपुलावरील पथदीप आणि चौफुलीवरील सिग्नल यंत्रणेसाठी केला जातो. रोज सुमारे ३५० युनिट वीजनिर्मिती केली जाते.कात्रजला दर गुरुवारी भारनियमन असल्याने त्यादिवशी वीजपुरवठा महापालिकेच्या विभागीय कार्यालयालाही केला जातो. प्रकल्पात जो मैला तयार होतो त्याचे खत तयार करून ते जवळच असलेल्या आजी-आजोबा उद्यानात टाकले जाते. प्रभागातच सर्वधर्मीय स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीतील उद्यानासाठी खतप्रकल्पातील क्लरीचा वापर केला जातो.
५ टन क्षमतेच्या या प्रकल्पासाठी अवघा ४५ लाखांचा खर्च आलेला आहे. या प्रकल्पासाठी ‘मेलहेम’ या संस्थेचे सहकार्य लाभत असून, कमेन्स इंडिया या संस्थेने वीजनिर्मितीसाठी जनरेटर उपलब्ध करून दिले आहे. सुका कचरा पुण्यातील प्लॉस्टिक असोसिएशनला विकला जातो. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना वेतन म्हणून दिले जाते.
या प्रकल्पाची पाहणी मनसेच्या सदस्यांनी केल्यानंतर काँग्रेसच्या एका नगरसेवकाने प्रभागात बनविलेल्या खतप्रकल्पाचीही पाहणी केली. (प्रतिनिधी)