मनपाने मागविले सहा टन अमोनियम बायो कार्बोनेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:12 AM2017-08-23T00:12:05+5:302017-08-23T00:12:57+5:30
महापालिकेने यंदाही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सहा टन अमोनियम बायो कार्बोनेट मागविले असून, सहाही विभागात नागरिकांना ते मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. मागील वर्षी पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेनेही अमोनियम बायो कार्बोनेटचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला होता.
नाशिक : महापालिकेने यंदाही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सहा टन अमोनियम बायो कार्बोनेट मागविले असून, सहाही विभागात नागरिकांना ते मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. मागील वर्षी पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेनेही अमोनियम बायो कार्बोनेटचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला होता. मागील वर्षी पुणे महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायो कार्बोनेट नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले होते. पीओपीच्या मूर्ती नदीपात्रातील पाण्यात विघटित होत नसल्यामुळे नदीप्रदूषणात भर पडते. त्यावर उपाय म्हणून पुणे महापालिकेने अमोनियम बायो कार्बोनेटचा वापर प्रायोगिक तत्त्वावर केला होता. गणेशमूर्तीचा आकार लक्षात घेऊन त्या प्रमाणात बादलीत अथवा कुंडात अमोनियम बायो कार्बोनेट टाकल्यास मूर्तीचे काही तासांमध्ये विघटन होते. पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेनेही मागील वर्षी ३ टन अमोनियम बायो कार्बोनेट मागवत ते नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले होते. त्याचे चांगले परिणाम दिसून आले होते. त्यामुळे, महापालिकेने यंदा सहा टन अमोनियम बायो कार्बोनेट मागविले आहे. प्रत्येकी एक टन अमोनियम बायो कार्बोनेट सहाही विभागात उपलब्ध करून दिले जाणार आहे. नागरिकांना मागणीनुसार त्याचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे व पर्यावरण विभागाचे प्रमुख वंजारी यांनी दिली आहे.