दिवसभरात कोरोनाचे तब्बल ३०३५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 03:02 AM2022-01-17T03:02:18+5:302022-01-17T03:02:27+5:30
जिल्ह्यात रविवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल ३०३५ रुग्णांची वाढ झाली असून, दुसऱ्या लाटेवेळीदेखील फार कमीवेळा रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, दिवसभरात १३५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना वाढीच्या रुग्णसंख्येमुळे उपचारार्थी संख्या दहा हजारांचा टप्पा ओलांडत थेट १०,९८२वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल ३०३५ रुग्णांची वाढ झाली असून, दुसऱ्या लाटेवेळीदेखील फार कमीवेळा रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, दिवसभरात १३५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना वाढीच्या रुग्णसंख्येमुळे उपचारार्थी संख्या दहा हजारांचा टप्पा ओलांडत थेट १०,९८२वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गत तीन दिवस सातत्याने दोन हजारांनजीक होती. रविवारी त्यात एक हजाराहून अधिक रुग्णांची वाढ होऊन दिवसभरातील रुग्णसंख्येने यंदाच्या वर्षात प्रथमच तीन हजारांचा टप्पा ओलांडला. एकेका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यातील बहुतांश रुग्णांना लक्षणे दिसून येत नसल्याने ते गृहविलगीकरणात राहण्यासच प्राधान्य देत आहेत. उपचारार्थी रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडणे हे आरोग्य विभागाच्या दृष्टीने चिंतेचे कारण ठरत आहेत. दरम्यान जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट हा शनिवारच्या तुलनेत काहीसा कमी होऊन ३२.८४ टक्क्यांवर आला आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रात हा दर ४८.४४ टक्के, नाशिक ग्रामीणला २१.९२, मालेगाव मनपा ३५.४७ तर जिल्हाबाह्य ५५.५० इतका पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९५.४३ टक्के इतके आहे. त्यात नाशिक मनपा ९४.९५ टक्के, नाशिक ग्रामीण ९६.१२ टक्के, मालेगाव मनपा ९५.६९ टक्के, तर जिल्हाबाह्य ९२.९८ टक्के इतके हे प्रमाण आहे. दरम्यान दिवसभरात एकाच बाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८७६८वर पोहोचली आहे.
इन्फो
प्रलंबित अहवालात घट
रविवारी चाचण्यांचे अहवाल अधिक प्रमाणात प्राप्त झाल्याने रुग्णवाढीच्या संख्येत मोठी वाढ आल्याचे दिसत आहे. मात्र, अहवालांचे प्रमाण वाढल्याने प्रलंबित अहवालांची संख्या अडीच हजारांवरून थेट ८९५पर्यंत खाली आली आहे. त्यातही नाशिक मनपा क्षेत्रातील ८०८, नाशिक ग्रामीणचे ५०, तर मालेगाव मनपाचे ३७ अहवाल प्रलंबित आहेत.