यंदाच्या वर्षी तब्बल ५० मुहूर्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:57+5:302021-02-11T04:15:57+5:30
यापुढील काळात एप्रिल महिन्यात लग्न करायचं असेल तर त्या महिन्यात आठ लग्नाचे मुहूर्त आहेत. विवाहाची तारीख निश्चित करुन त्यासाठी ...
यापुढील काळात एप्रिल महिन्यात लग्न करायचं असेल तर त्या महिन्यात आठ लग्नाचे मुहूर्त आहेत. विवाहाची तारीख निश्चित करुन त्यासाठी पुढील दोन महिन्यांचा वेळदेखील मिळणार आहे. त्यामुळे लग्नाची साग्रसंगीत तयारी करणे शक्य होणार आहे. एप्रिल महिन्यात २२,२४, २५,२६,२७,२८,२९ आणि ३० तारखेला मुहूर्त आहे. त्यात २४ आणि २५ हे आठवडाअखेरचे दिवस असल्याने या दोन तारखा दाट लग्नतिथी ठरू शकतात. यंदा जूनमध्ये साधारण आठ तारखांना शुभ मुहूर्त आहेत. या लग्नाच्या मुहूर्तांमध्ये ३, ४, ५, १६, २०, २२, २३, २४ जून या तारखांचा समावेश आहे, तर जुलै महिन्यात लग्नाचे ५ मुहूर्त आहेत. त्यात १, २, ७, १३ आणि १५ जुलै या तारखांच्या मुहूर्तांचा समावेश आहे. पण, जुलैनंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तिन्ही महिन्यांमध्ये एकही लग्नाचा मुहूर्त नाही. त्यामुळे ज्यांना वर्षाच्या मध्यात लग्न करायचे असेल त्यांच्यासाठी हे मुहूर्त उपयोगी ठरू शकतात. त्यानंतर थेट नोव्हेंबरमध्ये १४ नोव्हेंबरला देवशयनी एकादशी असल्याने या दिवसापासून विवाहाच्या मुहूर्तांना पुन्हा सुरुवात होईल. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये १५, १६, २०, २१, २८, २९, ३० नोव्हेंबर असे मुहूर्त साधता येणार आहेत.
इन्फो
मे महिन्यात सर्वाधिक १६ मुहूर्त
यंदा मे महिन्यात विवाहाचे सर्वाधिक मुहूर्त आहे. अगदी महिन्याच्या प्रारंभापासून ते अखेरपर्यंत त्यात मुहूर्त असल्याने कोणताही दिवस निवडता येणार आहे. मे महिना सुट्टीचा असल्याने सर्व नातेवाइकांना येणेदेखील शक्य होत असल्याने या महिन्याला अनेकांकडून प्राधान्य दिले जाते. एकूण सोळा मुहूर्त मे महिन्यामध्ये आहेत, तर यामध्ये साधारण चारही शनिवार आणि रविवार लग्न करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या जोडप्यांना मिळू शकतात. त्यात १ मेच्या शासकीय सुट्टीपासून २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २५, २६, २८, २९ आणि ३० मे या सर्व तारखांचा समावेश आहे.
इन्फो
वर्षाच्या अखेरच्या महिन्यातही मुहूर्त
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात लग्नासाठी सहा शुभ मुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये हवेत गारठा असल्याने विवाहासाठी हा सर्वाधिक आल्हाददायक महिना मानला जातो. या महिन्यातील मुहूर्तांनादेखील अनेकजण प्राधान्य देतात. त्यातही अगदी १ डिसेंबरपासून २, ६, ७, ११ आणि १३ डिसेंबर या दिवसांपर्यंत मुहूर्त आहेत. या वर्षाच्या अखेरीस दोनाचे चार हात करण्याची इच्छा असली तरी पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहेत.
कोट
यंदा विवाहाचे ५० मुहूर्त असून, कोरोनाचे संकट दूर होऊ लागल्याने सर्व विवाहसोहळे पूर्वीसारखे उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडू शकतील. त्यातही एप्रिल ते जुलैदरम्यान सर्वाधिक मुहूर्त असून, तोपर्यंत सर्व परि्स्थितीदेखील सुरळीत होऊ शकेल.
प्रदीप बोरकर, पुरोहित