अर्ज छाननीत अनेकांचे अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:42+5:302021-01-02T04:12:42+5:30
नाशिक: जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये अनेकांचे ...
नाशिक: जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये अनेकांचे अर्ज बाद झाल्याने त्यावरील हरकती आणि हस्तक्षेप यामुळे अर्ज छाननीची प्रक्रिया चांगलीच लांबली. दरम्यान, येत्या ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा दिवस असल्याने या मधल्या काळात अनेक राजकीय हालचाली होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीत नाशिक तालुक्यात २९ तर बागलाण तालुक्यात ३० उमेदवारांचे अर्ज बाद झाले. इतर तालुक्यात रात्री उशिरापर्यंत छाननीचे काम सुरु होते. रात्री आठ वाजेपर्यंत दिंडोरी, बागलाण, देवळा आणि नाशिक तालुक्यातीलच अर्ज छाननीची प्रकिया पूर्ण होऊ शकली. जिल्ह्यात १३ तालुक्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया गुरूवारी राबविण्यात आली. परंतु अनेक तालुक्यांमध्ये छाननी दरम्यान उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे आक्षेपामुळे काही ठिकाणी विलंब झाला. सायंकाळपर्यंत येवला १३, दिंडोरी १७, बागलाण ३०, नाशिक २९ व देवळ्यात एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. सिन्नर, कळवण, निफाड, चांदवड, मालेगाव, नांदगाव या तालुक्यातील अर्ज छाननीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. येत्या चार जानेवारीला अर्ज माघारी मुदत असून याच दिवशी चिन्ह वाटप होणार आहे.