नाशिकमधील उद्धव सेनेचे अनेक माजी नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत
By संजय पाठक | Updated: January 25, 2025 14:22 IST2025-01-25T14:19:42+5:302025-01-25T14:22:03+5:30
राज्यातील विधानसभा निवडणूकांनतर बदललेले राजकीय वारे बघून उद्धव सेनेचे अनेक नेते आणि माजी नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत, सुमारे अठरा ते वीस माजी नगरसेवक लवकरच पक्षांतर करणार आहेत.

नाशिकमधील उद्धव सेनेचे अनेक माजी नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत
नाशिक- राज्यातील विधानसभा निवडणूकांनतर बदललेले राजकीय वारे बघून उद्धव सेनेचे अनेक नेते आणि माजी नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत, सुमारे अठरा ते वीस माजी नगरसेवक लवकरच पक्षांतर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे नेते आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्क मंत्री खासदार संजय राऊत काही वेळातच नाशिकमध्ये दाखल होत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्र संपर्क मंत्रीपद आहे. यंदा उत्तर महाराष्ट्रातील उद्धव सेनेच्या वाट्याला आलेली एकही जागा हा पक्ष जिंकु शकलेले नाही. त्यातच नाशिक जिल्ह्यात त्यांचा विशेष संपर्क असला तरी नाशिकमध्ये उद्धव सेनेने सहा जागा लढवल्या होत्या. त्यातही यश न आल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. पक्ष नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नाशिकमधील कोअर कमिटीची बैठक मुंबईत घेतली असली तरी त्यातही गटबाजीचे दर्शन झाले हेाते. पक्ष सोडून कोण जाणार कोण नाही याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. त्यातच जिल्हा आणि शहर प्रमुख बदलण्याच्याही हालचाली सुरू असल्याने आता खासदार संजय राऊत नाशिकमध्ये मुक्कामी येत असून ते या सर्वच बाबत आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.