अन्नसुरक्षा योजनेपासून अनेकजण वंचित
By admin | Published: October 28, 2015 11:01 PM2015-10-28T23:01:45+5:302015-10-28T23:02:52+5:30
नांदूरशिंगोटे : यादीत नाव न आल्याने दीड वर्षापासून धान्य मिळत नसल्याची तक्रार
नांदूरशिंगोटे : पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दीड वर्षापासून अनेक लाभार्थींची नावे अन्नसुरक्षा योजनेच्या यादीत समाविष्ट होत नसल्याने त्यांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अशा केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्यासोबतच रॉकेलही मिळत नसल्याने पुरवठा विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दीड वर्षापासून रखडलेले यादीचे काम पूर्ण करून सणासुदीला तरी लाभार्थींना धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी उपसरपंच ज्योती वाघचौरे यांच्यासह केशरी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे.
येथे सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या दुकान क्रमांक ६१ मार्फत स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. येथे ९५३ केशरी, ८६ बीपीएल, तर १३२ अंत्योदय कार्डधारक आहेत. गतवर्षी फेबु्रवारी २०१४ मध्ये राज्यात अन्नसुरक्षा योजना लागू झाली. अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने निवडल्याने अनेक पात्र लाभार्थींना या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचे समोर आले आहे. अन्नसुरक्षा योजना सुरू होण्याआधी सर्व केशरी कार्डधारकांना गहू, तांदूळ मिळत होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून ग्रामीण भागात ७६.३२ इष्टांक गृहीत धरून ग्राहकांना लाभ द्यायचा होता. तथापि, येथील लाभधारकांच्या याद्या बनविताना इष्टांक गृहीत धरला नसल्याची तक्रार करण्यात आली. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या. १५ आॅगस्ट २०१४ च्या ग्रामसभेचा ठरावही पुरवठा विभागाला दिला आहे. मात्र पुरवठा विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात येथे झालेल्या महाराजस्व अभियानांतर्गत झालेल्या विस्तारित समाधान दिनाच्या बैठकीतही याबाबतची तक्रार करण्यात आली. तथापि, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
गेल्या दीड वर्षापासून केशरी कार्डधारक या योजनेपासून वंचित आहेत. सध्या एक हजार कार्डधारकांपैकी ५५० ते ६०० लोकांना लाभ मिळत आहेत. तीच परिस्थिती केरोसिनची आहे. पुरवठा विभागाकडून केशरी कार्ड दिले जाते; परंतु सदरच्या कार्डावर ग्रामीण भागातील नागरिकांना कोणताच लाभ मिळत नाही. केरोसिनचा पुरवठा कमी असल्याच्या कारणास्तव ते ग्राहकांना दिले जात नाही. दीड वर्षापासून कार्ड काढलेल्या लाभधारकांना केरोसिन नाही. त्यामुळे नांदूरशिंगोटे येथील केशरी कार्डधारकांना पुरेसा धान्य पुरवठा व केरोसिन मिळत नाही.
ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन आहे त्यांचे रॉकेल वितरण बंद करण्यात आले आहे. काही ग्रामस्थांनी दीड वर्षापूर्वीच केशरी कार्ड काढले त्यांना अगोदरच रॉकेल मिळत नव्हते. ज्यांना मिळत होते त्यांचेही रॉकेल बंद झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नवीन शिधापत्रिका दिल्यानंतर दोन किंवा तीन महिन्यांत रेशन व रॉकेल सुरू होईल असे पुरवठा विभागाने सांगितले होते. तथापि, प्रत्यक्षात दीड वर्षापासून दोन्हीही गोष्टी ग्राहकांना मिळत नाहीत. याबाबत पुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालून येथील दिवाळी सणाच्या अगोदर केशरी कार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी ज्योती वाघचौरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)