येत्या काळात अनेक लोकं भाजपात येणार, फडणवीसांनी सांगितली 'अंदर की बात'
By महेश गलांडे | Published: December 21, 2020 02:16 PM2020-12-21T14:16:41+5:302020-12-21T14:20:18+5:30
येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
नाशिक - सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने भाजपातील अनेक आमदार महाविकास आघाडीत येणार असल्याचे सांगण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात विधान केले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून पुंग्या सोडण्यात येत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट भाजपातच अनेक लोकांचे पक्ष प्रवेश होणार असल्याचं भाकीतही फडणवीस यांनी केलंय. नाशिक येथील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. यातच भाजपामध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही म्हटले होते. त्यामुळेच, सत्ताधाऱ्यांकडून मुद्दामहून अशी विधाने केली जात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आज माजी आमदार श्री. बाळासाहेब सानप जी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. देशाचा आणि राज्याचा विकास केवळ भाजपा करू शकतो, असा विश्वास बाळगून बाळासाहेब जी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज पक्ष प्रवेश केला आहे. pic.twitter.com/qzGycsrUsF
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 21, 2020
येत्या काळात अनेक लोकांचे भाजपात प्रवेश होणार आहेत, काहीजण रोज वावड्या उठवतात की भाजपाचे लोक आमच्याकडं येणार आहेत. पण, कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्याच पक्षातील नाराज आमदारांना संकेत देण्यासाठी या पुंग्या वाजवत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तिन्ही पक्षात अनेक आमदार नाराज आहेत, त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा, म्हणून असं बोललं जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितंल. तसेच, सर्वांना हेही माहितीय की, देशाचं भविष्य हे राहुल गांधी नाही, युपीए नाही. तर, या देशाचं वर्तमान आणि भविष्य हे नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे, एकादं धोक्यानं आलेलं सरकार किती काळ चालतं? कसं चालतं, यासंदर्भातील सगळी माहिती सगळ्यांना आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढावं ही तर माझीच इच्छा आहे, त्यांनी जरुर लढावं, असं आव्हानंही फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय.
अजित पवारांचा गौप्यस्फोट
तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार सहा महिन्यात जाईल, असे भविष्य आपण सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदार यांनीही भाजपाला नाकारले असे सांगून, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही त्यांनी मंगळवारी विधानसभेत म्हटले होते.