त्र्यंबक पालिकेत अनेक पदे रिक्त
By admin | Published: January 17, 2016 10:17 PM2016-01-17T22:17:35+5:302016-01-17T22:18:14+5:30
म्हणे शासनाकडून परवानगी मिळत नाही
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत सध्या नऊ पदे रिक्त असून, पालिका सेवेतून जे स्थायी कर्मचारी सेवानिवृत्त झालेत त्यांच्या जागी नव्याने पदे भरायची नाही किंबहुना ती पदे अस्थायी पदे म्हणून गणली जावीत आणि अस्थायी पदे रिक्त झाल्यास ती पदे व्यपगत झाली असा बदल झाला आहे. मात्र या नियमामुळे अनेकांना नोकरीस मुकावे लागले. पालिकेमध्ये सर्रास कंत्राटी पद्धत सुरू आहे.
त्र्यंबक नगरपािलकेची रिक्त जागांची पदे पाहता स्वच्छता निरीक्षक- १, फायर फायटरसाठी- ४ पदे (वर्ग-४), वीज तांत्रिक- १ आणि ड्रायव्हर कम फायर आॅपरेटर- १ अशी एकूृण नऊ पदे रिक्त आहेत. तथापि, अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. पालिका सेवेतून आतापर्यंत ५ ते ६ लिपिक सेवानिवृत्त झालेत. ती वर्ग-३ ची पदे रिक्तच आहेत.
कंत्राटी पद्धत कंत्राटदारांना व संबंधितांना पोसण्याचा व्यवसाय आहे. एक तर वशिल्याच्या ठेकेदारांनाच ठेका दिला जातो.
जास्त कामगार हजेरी पटावर
दाखविले जातात आणि पगार मात्र मोजक्याच कामावरील लोकांना
दिला जातो. विशेष म्हणजे, ठेका देतानाही आर्थिक गैरव्यवहार होत असतो. वर्ग-३, वर्ग-४ कामगारांना शासनाच्या आदेशाप्रमाणे किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळत नाही. या न्यायालयीन केसेस आजही प्रलंबित असून, ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
‘गावाने गावासाठी त्यांच्यातीलच काही लोक निवडून देऊन त्यांनी गावाचा कारभार पाहणे व निवडून दिलेल्या नगरसेवकांनी गावाचा विकास करणे’ ही स्थानिक स्वराज्य संस्थेची संकल्पना ! पण हल्ली या संस्थेत शासनाचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेत कंत्राटी पद्धत सुरू करून शासनाने पालिकेचे कंत्राटीकरण करून पालिकाच ताब्यात घ्यावी, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांनी व्यक्त केली आहे.