तुकाराम मुंढे यांनी नाशिक मनपात सुरू केलेल्या अनेक सेवा थंड
By संजय पाठक | Published: August 23, 2019 04:16 PM2019-08-23T16:16:03+5:302019-08-23T16:20:21+5:30
नाशिक- प्रशासकिय सेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याबद्दल महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दिल्लीत गौरव झाला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सुरू केलेल्या सेवा थंड होऊ लागल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी गुंडाळण्यात येऊ लागल्याने नागरीकांचा प्रतिसाद घटला आहे. तर महापालिकेत नागरीकांना येऊ लागु नये यासाठी असलेल्या सेवांचा प्रतिसाद घटल्याने राजीव गांधी भवन आणि विभागीय कार्यालयात राबता वाढु लागला आहे.

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारली आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांची बदली झाली. या कालावधीत त्याची कारकिर्द वादग्रस्त ठरली असली तरी प्रशासकिय सुधारणा पुरेपूर केल्या होत्या. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी इ कनेक्ट अॅप सुरू केल्यानंतर त्याची दखल न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आॅटो जनरेटेड मेमो चा प्रकार सुरू केला तर खाते प्रमुखांना आयुक्तांनी थेट नोटिसा देताना अनेकांना निलंबीतही केले होते. त्यामुळे महापालिकेचे इ कनेक्ट अॅप अत्यंत प्रभावी ठरले होते. आयुक्त स्वत: त्याचा आढावा घेऊन कारवाई करीत असल्याने अधिका-यांवर आॅनलाईन अॅपची मोठी धास्ती निर्माण झाली होती.
नागरीकांना त्यांच्या सेवा आॅनलाईन मिळाव्यात किंवा तक्रारी देखील आॅनलाईनच करता याव्यात आणि त्यांना कोणत्याही कामासाठी महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जावे लागू नये यासाठी त्यांनी तंत्रज्ञानावर भर दिला होता. ५५ प्रकारच्या परवानग्या आणि दाखल्यासाठी अॅपवर सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली होती. घंटागाडीचे ट्रॅकींग आणि ती येण्याचे अलर्ट देखील मोबाईलवर येतात.
दरम्यान, आयुक्त मुंढे यांच्या बदलीनंतर साºया सेवा थंडावल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी केल्या तरी त्यांचे निराकरण न करताच बंद करण्याची सोय तर आहेच परंतु अॅपवरून घरपट्टी सुध्दा भरण्यास अडथळे येतात. आयटी विभाग प्रमुख म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्या प्रशांत मगर यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर महपाालिकेला पात्र अधिकारी देखील सापडलेला नाही. तक्रारींसाठी महापालिकांना पुन्हा मुख्यालय आणि विभागीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
जन्म मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेत सर्वाधिक नागरीकांना यावे लागते. ते अॅपवर देण्याच्या पलिकडे जाऊन ईमेलने पाठविण्याचा देखील त्यांचा विचार होता. त्यानंतर अशा सेवांच्या केवळ चर्चाच झाल्या परंतु आॅनलाईनचा प्रभाव अत्यंत कमी झाला आहे.