मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:20 AM2019-04-21T00:20:14+5:302019-04-21T00:20:38+5:30
इगतपुरी रेल्वेस्थानकात विविध कामांकरिता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वे रद्द व काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
नाशिकरोड : इगतपुरी रेल्वेस्थानकात विविध कामांकरिता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वे रद्द व काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या रेल्वे व इतर मार्गे वळविण्यात आलेल्या रेल्वे यांची माहिती ऐनवेळी जाहीर करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय व हाल होत आहेत.
मध्य रेल्वेच्या कल्याण ते इगतपुरीपर्यंत तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, पुढील काम सुरू आहे. तसेच इगतपुरी रेल्वेस्थानकातील जुना पादचारी पूल तोडायचा असल्याने रेल्वे प्रशासनाकडून शुक्रवारपासून रविवारपर्यंत (१९ ते २१ एप्रिल) पॉवर ब्लॉक व मेगा ब्लॉक घेतला आहे.
रविवारी रेल्वे गाड्या रद्द
मेगा ब्लॉकमुळे रविवारी मुंबई-भुसावळ फास्ट पॅसेंजर, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे मार्गात बदल
मेगा ब्लॉकमुळे रविवारी एलटीटी- अलाहाबाद तुलसी एक्स्प्रेस, मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस या मुंबई, दिवा, वसई, जळगावमार्गे धावतील. तसेच रविवारची एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस ही कसारा रेल्वेस्थानकात सकाळी ८.३४ ते ११.१० पर्यंत थांबवून नंतर पुढे सोडली जाईल. एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेस खर्डी रेल्वेस्थानकातून ९.४१ ते ११ वाजेपर्यंत, मुंबई-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस आटगाव रेल्वेस्थानकातून सकाळी १० वाजेपासून १०.५८ पर्यंत थांबवून नंतर पुढे सोडली जाईल. तर मुंबई-नांदेड तपोवन छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ६.१० ऐवजी सकाळी ९.५ वाजता, एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस एलटीटी येथून ७.५० ऐवजी ९ वाजता सुटेल. तसेच शनिवारी नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस ही नाशिकरोडलाच थांबवून रविवारी नाशिकरोडहूनच नागपूरला रवाना होणार आहे.
प्रवाशांची गैरसोय
उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, सुट्टीच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून कामाकरिता मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या गाड्या, रेल्वे मार्गात केलेले बदल याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून ऐनवेळी जाहीर करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. रेल्वे प्रशासन मेगा ब्लॉक काळात रद्द होणाऱ्या गाड्या, मार्गात होणारे बदल याबाबत काही दिवस अगोदर माहिती देत नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.