कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प; पंचवटीसह अनेक रेल्वे गाड्या रद्द
By प्रसाद गो.जोशी | Published: July 7, 2024 12:05 PM2024-07-07T12:05:13+5:302024-07-07T12:05:29+5:30
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले आहेत.
इगतपुरी (गणेश घाटकर) : मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
मुंबईत सह कल्याण ते कसारा परिसरात तुफान पाऊस सुरू असल्याने याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी येथे रद्द करण्यात आली असून अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले आहेत.
काल मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली आहे. तर वाशिंद जवळ ट्रॅकवर वाळू, माती जमा झाली आहे त्यामुळे चार ते पाच तास बंद राहणार असुन रेल्वे प्रशासनाकडुन प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सुविधा देण्यात आलेली नाही. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे