रूंदीकरणाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:11 PM2020-04-06T16:11:55+5:302020-04-06T16:13:02+5:30
नांदगाव-साकोरा रस्ता रूंदीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून कासवगतीने सुरू असून, सदर कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र त्याअगोदर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही निंबाच्या झाडांची रस्ता रूंदीकरणाला कुठलीही अडचण नसतांना कत्तल केल्याने परिसरातील वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
साकोरा : नांदगाव-साकोरा रस्ता रूंदीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून कासवगतीने सुरू असून, सदर कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र त्याअगोदर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही निंबाच्या झाडांची रस्ता रूंदीकरणाला कुठलीही अडचण नसतांना कत्तल केल्याने परिसरातील वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोरखडी बंधाऱ्यानजिक रस्त्याची दुरावस्था झाली होती. यासंदर्भात दुरु स्तीसाठी वाहनचालकांनी अनेकदा मागणी केली होती.त्यानंतर शिवमळा वस्तीपासून साकोरा गावापर्यंत तीन किलोमीटर रस्ता रूंदीकरणाला आणि दुरूस्तीसाठी मंजुरी मिळाली. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील एकाच घरांतील दोन ठेकेदारांना हे काम दिले असल्याचे समजते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन मीटर रूंदीकरणाचे काम सुरू करण्यासाठी या विभागाने नांदगाव मधील एका व्यक्तीला झाडे तोडण्याचे आदेश दिले. या रस्त्यालगत गेल्या कित्येक वर्षांपासून उभ्या असलेल्या निंबाच्या अनेक झाडांची कुठलीही अडचण नसतांना ती तोडल्याने रस्ता बोडखा झाला आहे. त्यामुळे आता तप्त उन्हाळ्यात सावली देणाºया या झाडांची उणीव वाटसरूंना भासत आहे. विशेष म्हणजे काही शेतक-यांच्या बांधावरील झाडे देखील तोडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सदर रस्त्यांचे काम ठेकेदाराने अगदी संथपणे सुरू केले असून, सध्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याचे पाहून त्यांच्या मर्जीनुसार पाण्याचा वापर न करता साईडपट्टी खोदल्या व त्यावर अत्यल्प प्रमाणात डांबराचा वापर करून काम उरकण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे सदर रस्ता किती दिवस चांगला राहील याबाबत परिसरातून शंका व्यक्त केली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोरखडी बंधा-यानजिक दोन्ही बाजूला तसेच रस्त्यावर पाणी वाहत असल्याने या ठिकाणी दोन मोठे पाईप टाकणे गरजेचे असतांना देखील सदर काम तसेच सुरू आहे. रस्ता रूंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर देखील वाहनचालकांना रस्त्यावर वाहणाºया पाण्यातून कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने काम पूर्ण होण्याच्या अगोदर याठिकाणी मोरीचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.