सरपंचपदाच्या आरक्षणामुळे अनेकांची होणार पंचाईत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 07:33 PM2020-12-17T19:33:02+5:302020-12-18T00:25:06+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे वगळता परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कालावधी कमी केल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत निघणार असल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर सहा महिने पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. कोणकोणाकडून उमेदवारी करू शकतो, याचे आडाखे बांधले जात असून, गावातील धनदांडग्यांना गळाला लावण्यासाठी गुप्त बैठका सुरू आहेत. त्यामुळे गावातील वातावरण आतापासून ढवळून निघाले असून, कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. आगामी काळात होणाऱ्या बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, स्टाइस, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. परिसरातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, तसेच दोडी, दापूर, मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ, सुरेगाव, खंबाळे, दातली, माळवाडी, दत्तनगर, चापडगाव, धुळवड, दोडी खुर्द, गोंदे, पाटोळे आदी गावात निवडणुकीचा धुराडा उडणार आहे.
ऐन थंडीत गावगाडा तापणार
ऐन थंडीत नांदूरशिंगोटे परिसरात गावगाडा तापणार आहे. पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची तयारी सुरु केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने गावोगावचे पुढारी आता तयारीला लागले आहेत. गावातील प्रमुख नेतेमंडळीच्या पडद्याआडून हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सत्ताधारी व विरोधकांचे गट गावात सक्रिय झाले असून, त्यांनी गावातील संपर्क वाढविला आहे. काहींनी तर खर्च करण्यासही सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. पुढाऱ्यांच्या घरी राबता वाढला आहे.
उत्सुकता शिगेला
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक निकालानंतर काढले जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. तसेच यावेळी प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड होणार असल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील गावात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.