Maharashtra Bandh : नाशिकमध्ये महिला आंदोलकांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 04:11 PM2018-07-27T16:11:37+5:302018-07-27T16:19:13+5:30
मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये गनिमी काव्याने आंदोलनाला सुरुवात केली आहे.
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये गनिमी काव्याने आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाची सुत्र आता महिलांनी हाती घेत शुक्रवारी (27 जुलै) गोदावरी नदीपात्रात उतरून आंदोलन केले. तर काही महिलांनी बानेश्वराला दुग्धाभिषेक करून सरकार विरोधात निषेध नोंदवला.
नाशिक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू असताना प्रशासनाने ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आंदोलन करू नये यासाठी नोटिसा पाठविल्याने नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयकांनी आंदोलनात पुढाकार घेत आंदोलनाची धुरा सांभाळली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यापुढे नाशिक जिल्हयात आंदोलनाचे नेतृत्व महिला सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी महिलांनी गोदावरी परिसरात आंदोलन करीत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलकांना गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे आंदोलकांनी सत्र न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आवारात ठाण मांडून आंदोलनास सुरुवात केली. येथेही केवळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. त्यामुळे शुक्रवारपासून गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला असून आंदोलन करण्यासाठी प्रशासन जागा देत नाही, आता कुठे आंदोलन सुरू आहे ते शोधा असा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या माधवी पाटील व पूजा धूमाळ या महिलांनी गोदावरीच्या पात्रात उतरून आंदोलनक केले तर अस्मिता देशमाने आणि मंगला शिंदे या महिलांनी बानेश्वराला दुग्धाभिषेक करीत सरकार विरोधात घोषणाबाजी करून मराठा आरक्षणाची मागणी केली.
औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या काकासाहेब शिंदे नावाच्या तरुणाने गोदावरी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतल्यानंतर अशा प्रकारे मराठा आंदोलकांनी पाण्यात उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली. नाशिकमध्ये शुक्रवारी महिला आंदोलकांनी पाण्यात उतरून आंदोलन केल्याने प्रशासनासमोर आंदोलकांना रोखण्याचे आवाहन निर्माण झाले आहे.