नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांचं बोंबाबोंब आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 11:21 AM2018-07-28T11:21:58+5:302018-07-28T11:29:08+5:30
आमदारांच्या घरांवर ठिय्या आंदोलन करून मराठा समाज आपल्या मागण्यांवर व आंदोलनावर कायम राहणार आहेत.
नाशिक : सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (28 जुलै) आरक्षणासह विविध मागण्यांसाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरावर बोंबाबोंब ठिय्या आंदोलन केले.
नाशिक सकल मराठा समाजाचे आंदोलन पर्व अद्यापही ठोक मोर्चाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर चालू आहे. आतापर्यंत रास्तारोको, जिल्हा बंद, ठिय्या आंदोलन, प्रतिकात्मक जलसमाधी असे विविध आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवला गेला आहे. आजपासून जिल्ह्यातील आमदारांच्या घरांवर ठिय्या आंदोलन करून मराठा समाज आपल्या मागण्यांवर व आंदोलनावर कायम राहणार आहेत.
आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी बोंबाबोंब करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते हातात झेंडे घेत जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, बात तो आपको करणी होगी, करणी होगी, फडणवीस सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी करत होते.
सकल मराठा समन्वय समितीचे तुषार जगताप, करण गायकर, योगेश निसाळ, संदीप लभडे, शरद तुंगार, मदन गाडे, उमेश शिंदे, संतोष मालोडे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने, प्रियदर्शनी काकडे, मंगला शिंदे,मनोज सहाणे, किरण पाणकर, अमोल वाजे, आप्पा गाडे, ज्ञानेश्वर जाधव, विलास काहनमाले, सुरज सोलनकी आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.