मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ; प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 04:01 PM2020-06-28T16:01:53+5:302020-06-28T16:05:18+5:30
सारथी संस्थेची स्वायत्ताही काढून घेण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहाची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित असून या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या नाही तर ९ ऑगस्टपासून मराठा समाज पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन सुरु करेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला आहे.
नाशिक : कोपर्डीतील अत्याचार प्रकरणातील पिडिता अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असून सारथी संस्थेची स्वायत्ताही काढून घेण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहाची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित असून या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या नाही तर ९ ऑगस्टपासून मराठा समाज पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन सुरु करेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर आता ७ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने पूर्ण ताकदीनिशी मराठा आरक्षणाची बाजू मांडावी, असा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या शनिवारी (दि.२७) झालेल्या ऑनलाईन बैठकीत मांडण्यात आला. त्याचप्रमाणे मराठा आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सरकारने त्वरित पूर्ण करावी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळमार्फत थेट कर्ज देण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू करावी व त्यासाठी वाढीव निधीची तरदूद करण्याची मागणी यावेळी पुढे आली. ४७ दिवस आजाद मैदानावर २०१४ इएसबीसी उमेदवारांचा विषय सरकारने तात्काळ मार्गी लावण्यासाठी सरकारकडे मागणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. खोट्या अॅट्रॉसिटीच्या घटनांबाबत याबैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. सोशल मीडिया वर महिलांच्या अपमानाचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. या ऑनलाईन बैठकीला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक,जळगाव, जालना, नागपूर, अकोला, नंदुरबार येथील वीरेंद्र पवार, विनोद पाटील, राजेंद्र्र कोंढरे, दिलीप पाटील, विनोद साबळे, अंकुश कदम, करण गायकर, माऊली पवार, रवी मोहिते, दिलीप देसाई, राजेंद्र दाते-पाटील, अप्पासाहेब कुढेकर-पाटील आदी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.