मराठा आरक्षणासाठी पेटून उठा
By admin | Published: November 29, 2015 11:07 PM2015-11-29T23:07:23+5:302015-11-29T23:09:49+5:30
नितेश राणे : एल्गार मेळाव्यात आवाहन
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा खोटा, अपमानकारक इतिहास लिहूनही महाराष्ट्रभूषण पुरस्कार देणाऱ्या राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची खरोखरच मानसिकता आहे का? विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखालील आरक्षण समितीत केवळ बैठकांचा फार्स सुरू आहे़ त्यामुळे आता आरक्षण मागणार नाही, तर ते मिळविणारच अशी गर्जना करून आरक्षणासाठी पेटून उठा, असे आवाहन ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केले़ यावेळी आरक्षणास विरोध करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे, विनायक मेटे यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली़
मराठा एकीकरण समितीच्या वतीने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना राणे म्हणाले की, मराठा समाज आग असून, तो शांत झाल्याने ही आग पुन्हा पेटविण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत ही आग पेटविण्यासाठीच बाहेर पडलो आहे. अर्ज, विनंत्या, समित्यांच्या बैठका आता खूप झाल्या आहेत़ त्यामुळे आरक्षण मागणार नाही, ते मिळविणारच, अशी गर्जना राणेंनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्र माचा, इतिहासाचा मराठ्यांना विसर पडला की काय असा प्रश्न पडतो. याचे कारण म्हणजे शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांसह महापुरुषांचा चुकीचा इतिहास मांडूनही राज्य सरकार बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करते आणि तरीही आम्ही पेटून उठत नाही़ कुठे गेले आपले शौर्य? कुठे गेली मराठ्यांच्या रक्तातली आग? विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला विनोद तावडे, विनायक मेटे यांच्यासारखे मराठा नेते हजर राहतात़ तावडेंमध्ये हिंमत असेल तर नारायण राणेंसारखे आरक्षण देऊन दाखवा़
माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितले की, आरक्षणासाठी इतर समाजाच्या नेत्यांचे उंबरे झिजविण्यापेक्षा मराठा समाजाची ताकद दाखवून देण्याची आवश्यकता आहे़ मी सर्वप्रथम मराठा त्यानंतर पक्ष़ यापूर्वीही असे अनेक पक्ष मी सोडले आहेत. समाजासाठी पक्षाच्या विरोधात उभे राहण्याची भूमिकाही त्यांनी बोलून दाखविली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. संदीप कोतवाल यांनी परिषदेचा उद्देश सांगून आरक्षणासाठी सर्व मराठा संघटना पहिल्यांदाच एकत्रित आल्याचे सांगितले.
यावेळी राजेंद्र कोंढरे, माजी खासदार माधवराव पाटील, शिवाजी शेलार, संतोष पाटील, नगरसेवक वत्सला खैरे, विक्र म कदम आदिंसह मराठा समाजातील सुमारे ३० विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़(प्रतिनिधी)
राज्य सरकारवर टीकाराज्यात भाजपा, शिवसेनेचे सरकार आहे तोपर्यंत मराठ्यांना, बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही. मराठा ३३ टक्के, बहुजन समाज ७० टक्के असूनही तीन टक्के लोकसंख्या असणारे लोक राज्य करत आहेत. राज्यकर्त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही त्यामुळे ते मिळणारच नाही़ त्यामुळे मराठा समाजाला स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी पेटून उठावे लागेल, तेव्हा पेटून उठा, आरक्षणाच्या लढ्यात साथ द्या, आता आरक्षण मागायचे नाही, तर ते मिळवायचेच अशी गर्जनाही नितेश राणे यांनी यावेळी केली.