ठिय्या आंदोलनासाठी मराठा आंदोलक मुंबईला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:28+5:302020-12-14T04:30:28+5:30
नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत आझाद मैदानावर होणारे ठिय्या आंदोलन मोडून काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह ...
नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत आझाद मैदानावर होणारे ठिय्या आंदोलन मोडून काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह आंदोलकांवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असून, सरकारमधील काही मंत्री सत्तेचा गैरवापर करून आझाद मैदावरील ठिय्या आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काही समन्वयकांनी केला आहे. तर काही समन्वयक ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गनिमी काव्याचा वापर करीत एक दिवस अगोदरच मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, त्यांनी आझाद मैदानावर आक्रमकपणे ठिय्या आंदोनल करण्याची रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाला स्थगितीपूर्वीपासूनच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले तालाठी, मेट्रो, राज्यसेवा, महावितरण भरतीतील एसईबीसी मराठा उमेदवार मुंबईच्या आझाद मैदानावर दि. १४ आणि १५ डिसेंबरला आंदोलन करणार आहेत. या विविध विभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक आझाद मैदानावर जाणार असल्याचा निर्णय राज्य समन्वयकांच्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार, नाशिक जिल्ह्यातील समन्वयकांनी शनिवारी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीतही हजारो आंदोलकांनी आझाद मैदानावर धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार काही आंदोलकांनी सोमवारपासून होणाऱ्या ठिय्या आंदोलनासाठी रविवारीच नाशिक सोडून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. तर काही समन्वयकांसह आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याने त्यांना आंदोलनत सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने जाण्यात अडचणी येत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.