मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:11 AM2018-08-10T01:11:28+5:302018-08-10T01:12:37+5:30
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी क्रांतिदिनी करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला़ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली़ त्याचप्रमाणे काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी काही ठिकाणी अन्य संघटनाही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या़
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी क्रांतिदिनी करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला़ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली़ त्याचप्रमाणे काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी काही ठिकाणी अन्य संघटनाही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या़
कसबे सुकणेत बंद
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कसबे सुकेणे व मौजे सुकेणे या दोन्ही गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकल मराठा समाजाचे धनंजय भंडारे, दत्ता पाटील, कैलास भंडारे, अरुण भंडारे, सचिन पाटील, आनंदा भंडारे, वृषभ जाधव, श्यामराव शिंदे, लोचन पाटोळे, योगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातून रॅली काढण्यात आली. व्यापाºयांनीही बंदला प्रतिसाद दिला. दरम्यान आरक्षणासाठी बाणेश्वराची महाआरती करीत साकडे घालणार असल्याची माहिती संग्राम मोगल यांनी दिली. शहरबसेस बंदमुळे धावल्या नाहीत. त्यामुळे सुकेणा ते नाशिक व उपनगरात दररोज ये-जा करणारे चाकरमाने व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. अनेकांनी कसबे सुकेणे रेल्वेस्थानक गाठून भुसावळ-मुंबई पॅसेंजर रेल्वेगाडीने नाशिकरोड गाठले.
पांगरीत कडकडीत बंद
आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने पांगरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर न उतरता फक्त ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सिन्नर-शिर्डी रस्त्यावर आमदार राजाभाऊ वाजे, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. याप्रसंगी विलास पांगारकर, अण्णासाहेब खाडे, प्रदीप बेलोरे, किशोर चव्हाण यांची भाषणे झाली. आंदोलनात सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, रवि पगार, संपत पगार, वसंत पगार, आत्माराम पगार, प्रकाश पांगारकर, बाबासाहेब पगार आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दरेगावला रास्ता रोको
दरेगाव : गुरुवारी सकल मराठा समाजातर्फेपुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये दरेगावकर सहभागी होते. येथील मनमाड-उमराणे-साक्री राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले.दरेगाव येथे रस्ता रोको करीत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी चांदवड पोलीस ठाण्याचे हवालदार नरेंद्र सांैदाणे, संसारे व पोलीसपाटील सोमनाथ गांगुर्डे यांना मराठा समाजाचे नथू देवरे, संजय गांगुर्डे, माधव देवरे, दिनेश पगार, तुळशीराम गांगुर्डे, सीताराम पगार आदींनी निवेदन दिले.
डोणगाव येथे सकल मराठा समाजातर्फे बंद पाळण्यात आला. मनमाड-उमराणे रोडवरील सर्व दुकाने, हॉटेल दिवसभर बंद ठेवण्यात आले. गावातील सर्व समाजबांधवांनी शेतीची कामे बंद ठेवून सकल मराठा क्र ांती मोर्चाच्या बंदमध्ये सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्थांनी निमोण चौफुलीजवळ जमून निषेध नोंदविला. यावेळी पोलीसपाटील मणीलाल जेजूरे यांना निवेदन देण्यात आले.
कळवाडी फाट्यावर चक्का जाम
कळवाडी : मालेगाव तालुक्यातील कळवाडी फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कळवाडीसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी सवाद्य मोर्चा काढून ग्रामस्थ कळवाडी फाट्याजवळ जमले. राज्य मार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलन शांततेत पार पडले.
आघार चौफुलीवर रास्ता रोको
आघार : सटाणा-मालेगाव रस्त्यावर आघार चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ढवळेश्वरसह परिसरातील ग्रामस्थ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. व्यापारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
नामपूर रस्त्यावर ठिय्या
वङनेर : येथे मालेगाव-नामपूर रस्त्यावर दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे व मधू माऊली वडगावकर यांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले. सहायक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांना निवेदन देण्यात आले.
सटाणा नाका परिसरात बंद
कलेक्टरपट्टा : सटाणा नाका परिसरात बंद पाळण्यात आला. यावेळी परिसरातील व्यापाºयांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला. यावेळी दुचाकी रॅली काढण्यात आली. फेरीमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग होता. कसबे सुकेणे येथील गजबजणारा मेनरोड बंदमुळे असा निर्मनुष्य झाला होता.