माझ्या नादी लागाल तर याद राखा; नाशकात मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सज्जड दम
By Suyog.joshi | Published: August 13, 2024 06:49 PM2024-08-13T18:49:07+5:302024-08-13T18:49:36+5:30
नाशकात शांतता रॅलीचा समारोप, रॅलीनंतर सीबीएस चौकात उपस्थित मराठा समाज बांधवांना संबोधित करतांना जरांगे पाटील बोलत होते.
नाशिक - छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आता भाजप नेत्यांच्या मागे लागून मराठ्यांमध्ये भांडणं लावत आहे. यापुढे माझ्या नादी लागाल तर याद राखा, येवल्यात येऊन पराभूत करून दाखवू असा सज्जड दम मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना भरला. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी (दि. १३) नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
रॅलीनंतर सीबीएस चौकात उपस्थित मराठा समाज बांधवांना संबोधित करतांना जरांगे पाटील बोलत होते. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाने राज्याला दिशा दिली. कडवटपणा काय असतो तो नाशिकच्या समाजबांधवांनी शिकविला, मराठ्यांची कॉलर टाइट केली. मराठवाड्यापेक्षाही येथे एकजूट अधिक दिसून आली. कट्टरपणा काय असतो ते दाखवून दिले. यापुढे कोणत्याही नेत्यासाठी किंवा पक्षासाठी नव्हे तर जातीसाठी, आपल्या लेकरांसाठी लढायचे असा सल्लाही त्यांनी मराठा समाज बांधवांना दिला. मराठा समाजाच्या वेदना सरकारच्या लक्षात येत नाही. पक्षाला, नेत्याला बाप मानन्यापेक्षा जातीला बाप माना असा सल्ला दिला. जरांगे पाटील म्हणाले, निवडणूक आल्यावर भावनिक होवू नका. कोणीही नेता आपला नाही, पक्ष आपला नाही. आरक्षण मिळत नसल्याने आपली लेकरं बाळं मोठी होत नाही. वेळ आली की बदला घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तब्येत ठिक नसतांनाही हजेरी
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ठिक नसतांनाही ते शांतता रॅलीच्या समारोप सभेत सहभागी झाले. त्यांना डॉक्टरांनी १८ मिनिटांच्यावर भाषण करू नका असा सल्ला दिल्यानंतरही ते तब्बल ४५ मिनिटे व्यासपीठावर बोलले. व्यासपीठावर बोलत असतांना त्यांना अचानक बसून बोलण्याची इच्छा झाली. परंतु ते बसू शकले नाही. त्यांच्या कमरेतही वेदना होत असल्याचे दिसून येत होते. उपोषणामुळे माझे अंग गळून गेले आहे. फारशी ताकद राहिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी भाषण आटोपते घेतले. डॉक्टरांच्या सल्याने ते थेट आंतरवली सराटीत जावून ॲडमिट होणार असल्याचे त्यांनी सभेत सांगितले.
२९ ला ठरवू लढायचं की पाडायचं !
येत्या २९ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीत सर्व समाजबांधवांनी यावे. त्या ठिकाणी आपण विधानसभा निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचे असा निर्णय घेऊ असे जरांगे पाटील यांनी सभेत आवाहन केले.