Maratha Reservation: संभाजीराजेंनी सरकारला दिली महिनाभराची मुदत; पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:41 AM2021-06-22T06:41:47+5:302021-06-22T06:42:15+5:30
Maratha Reservation: येत्या गुरुवारी राज्य शासन रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहे.
नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील निकालाचा फेरविचार व्हावा, यासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यासाठी राज्य शासनाने मुदत मागितली होती. त्यानुसार एक महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही कार्यवाही पूर्ण झाली नाही तर पुन्हा समाज आंदोलन करेल, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या विषयावर कोंडी फुटावी, यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय मूक आंदोलन सोमवारी येथे करण्यात आले. गंगापूर रोडवर झालेल्या या आंदोलनात संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली समाजाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
येत्या गुरुवारी राज्य शासन रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहे. त्यासाठी २१ दिवसांचा वेळ मागितला असल्याने आंदोलन पुढे ढकलले आहे. आपण राज्यभर दौरा करणार असून महिनाभरात मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल. राज्य शासन आणि केंद्र सरकारने समन्वयाची भूमिका घेतली तरच आरक्षण मिळू शकेल, असे संभाजीराजे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या सूचनेचे स्वागत
मुंबईतील विमानतळाला छत्रपती शिवरायांचे नाव देण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे खा. संभाजीराजे यांनी स्वागत केले.