Maratha Reservation: उद्या नाशकात बंद नाही, पण, सरकारच्या निषेधार्थ....,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:13 PM2018-08-08T16:13:50+5:302018-08-08T16:15:01+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९) सकल मराठा समाजाकडून राज्यभरात बंद पुकारला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत नाशिक जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण समाजाची बैठक बुधवारी (दि. ८) दुपारी झाली.
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकल मराठा समाज नाशिक शहरासह जिल्ह्यात कोठेही कोणत्याही प्रकारचा बंद पुकारणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. नाशिककरांनी सोशल मीडियावरील बंद संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९) सकल मराठा समाजाकडून राज्यभरात बंद पुकारला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत नाशिक जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण समाजाची बैठक बुधवारी (दि. ८) दुपारी झाली. या बैठकीत कुठल्याही प्रकारे शहरात व जिल्ह्यात बंद पुकारला जाणार नाही तसेच चक्का जाम आंदोलनही केले जाणार नाही, मोर्चे काढण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सकाळी दहा वाजेपासून मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र येतील आणि संध्याकाळपर्यंत ठिय्या आंदोलन करतील, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. तालुका पातळीवर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर केवळ ठिय्या आंदोलन समाजबांधव शांततेत लोकशाही मार्गाने करणार आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयापुढे ठिय्या आंदोलनाचाही ठराव यावेळी सर्वांनुमते मंजूर करण्यात आला.
सोशल मीडियावर बंदबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर कुठल्याहीप्रकारे नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा पातळीवर हा निर्णय घेतला असून, नाशिक जिल्ह्यात कुठेही बंद पुकारला जाणार नाही असे सांगण्यात आले. बंद पूर्णत: रद्द करण्यात आला असला तरी सरकारपर्यंत मागणी पोहोचविण्यासाठी सरकारी कार्यालयांपुढे ठिय्या दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन संध्याकाळी ठिय्या आंदोलनाच्या समाप्तीनंतर दिले जाणार आहे. बैठकीला माजी महापौर प्रकाश मते, चंद्रकांत बनकर, अॅड. श्रीधर माने, हंसराज वडघुले, सुनील बागुल, अर्जुन टिळे, करण गायकर, तुषार जगताप, योगेश कासवे या पदाधिकाºयांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१८ नोव्हेंबरचा अखेरचा अल्टिमेटम
स्वातंत्र्यदिनी राष्टध्वजाला मानवंदना दिल्यानंतर गावांमध्ये होणाºया ग्रामसभांमध्ये मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडण्यात येणार असून, या सभेचा अहवाल सरकारपर्यंत पोहोचविला जाणार आहे. तसेच सरकारला १८ नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यात संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याचेही बैठकीत यावेळी सांगण्यात आले.