शहरातील अन्य बोर्डांच्या शाळेतही मराठीचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:37 AM2019-06-22T00:37:12+5:302019-06-22T00:37:44+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) व इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) या बोर्डाच्या अंतर्गत शहरात जवळपास ९० शाळा असून, या शाळांमधून आठवीपर्यंत मराठी विषय शिकविला जात असल्याचे समोर आले आहे.
नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) व इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) या बोर्डाच्या अंतर्गत शहरात जवळपास ९० शाळा असून, या शाळांमधून आठवीपर्यंत मराठी विषय शिकविला जात असल्याचे समोर आले आहे. राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम शिकविला जाणार असला तरी राज्य शासनाच्या मान्यतेने या शाळा सुरू असल्यामुळे अशा शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे सक्तीचे आहे. त्याशिवाय या बोर्डाला संलग्नता मिळू शकत नाही. त्यानुसार अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत मराठी विषयाचे शिक्षण दिले जाते.
शहरात राज्य मंडळाबरोबरच अन्य बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. राज्य मंडळाचा अभ्यासक्रमामध्ये मराठी विषय हा बंधनकारक आहेच, परंतु अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करताना मराठी विषय शिकविणेदेखील बंधनकारक असल्यामुळे इयत्ता आठवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. मराठी विषयासाठी स्वतंत्र शिक्षक आणि तासिका बंधनकारक असून, त्यावर त्यांची संलग्नता अवलंबून असल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अन्य बोर्डाच्या शाळा असल्या तरी त्यामध्ये मराठी अनिवार्य आहेच.
अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम असलेल्या शहरात जवळपास ९० शाळा असून, त्यातील काही शाळांमधील मराठी तासिकाविषयी माहिती घेतली असता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मराठी विषय शिकविला जात असल्याचे समोर आले. नववी आणि दहावीसाठी फ्रेंच किंवा संस्कृत विषयांचा आॅप्शन देण्यात आला आहे. शहरातील इस्पालिअर स्कूल, ग्लोबल व्हिजन, रायन इंटरनॅशनल, रासबिहारी, अशोक युनिव्हर्सल, केंद्रीय विद्यालय, आदी शाळांचा प्रतिनिधिक आढावा घेतला असता त्यामध्ये मराठी तासिकाबरोबरच मराठी सण आणि मराठी भाषा दिनसारखे कार्यक्रमदेखील राबविले जातात.
इतर बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे बंधनकारकच आहे. त्याशिवाय इतर बोर्डाला राज्य शासनाकडून संलग्नता मिळत नाही. इंग्रजी शाळांमध्ये आठवीपर्यंत मराठी शिकविले जात असल्यामुळे मराठी भाषेचा सन्मान राखला जातोच. महाराष्टÑातील मातीत रुजलेले विविध पारंपरिक सण, सोहळे इंग्रजी शााळेत मोठ्या उत्साहात होतात.
- निवेदिता कमोद, प्रशासकीय व्यवस्थापक,
रासबिहारी इंग्लिश मिडियम स्कूल
बोर्ड कोणतेही असो इंग्रजी शाळेत मराठी शिकविणे हे बंधनकारकच आहे. मोठ्या शहरात अंमलबजावणी फारशी होत नाही. नाशिकपुरते बोलायचे झाल्यास नाशिक शहरातील इंग्रजी शाळांमध्ये हा नियम पाळला जातो असे ठामपणे सांगता येऊ शकते. इंग्रजी शाळा विषय आणि तासिका यांचे वेळापत्रक पाळताना दिसतात.
- सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक