मराठी वैभव सांगणारी भाषा! किशोर पाठक : मुक्त विद्यापीठातर्फे विशाखा, श्रमसेवा, रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:52 AM2018-02-28T01:52:14+5:302018-02-28T01:52:14+5:30
नाशिक : सध्याच्या स्थितीत मराठी भाषेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी मराठी भाषा ही दैन्य सांगणारी नव्हे, तर वैभव सांगणारी आहे.
नाशिक : सध्याच्या स्थितीत मराठी भाषेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी मराठी भाषा ही दैन्य सांगणारी नव्हे, तर वैभव सांगणारी आहे. त्यामुळे मराठी माणसानेही मराठीच्या वैभवाचेच गुणगान करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे गंगापूररोड परिसरातील एका मंगल कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात विद्यापीठाच्या वतीने नाशिकच्या सुनीता पाटील यांना समाजकार्यासाठी श्रमसेवा तर मुंबई येथील दुर्गा गुडिलू यांना रुक्मिणी पुरस्काराने गौरविण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरु ई. वायुनंदन, कुलसचिव दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण केंद्राच्या संचालक डॉ. विजया पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नवोदित कवी ठाण्याचे सुशीलकुमार शिंदे यांना ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहासाठी प्रथम, सिन्नर येथील रवींद्र कांगणे यांना ‘एठन’ काव्यसंग्रहासाठी द्वितीय व सांगलीच्या सुनीता बोर्डे-खडसे यांना तृतीय क्रमांकाचा विशाखा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी किशोर पाठक म्हणाले, कवीने एकट्याने नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोबाइलमुळे माणूस अस्वस्थ झाला असला तरी मराठी माणसाने सोशल माध्यमांचा मराठीच्या विकासासाठी वापर करण्याचे आवाहनही किशोर पाठक यांनी यावेळी केले. यावेळी ई. वायुनंदन यांनी प्रत्येकाला मातृभाषेविषयी प्रेम व जिव्हाळा वाटत असला तरी मराठीतील गोडवा सर्वांनाच आकर्षित करणारा असल्याचे सांगितले. प्रास्ताविक दिनेश भोंडे यांनी केले. सूत्रसंचालन श्याम पाडेकर आणि आभार विजया पाटील यांनी मानले.
बेदखल शहरात माणसांचे चित्र कवितातून व्यक्त
महानगरच्या संवेदना आपल्या कवितांतून समाजातून मांडल्या. बेदखल झालेल्या शहरात माणसांचे चित्र कवितातून व्यक्त केले. आज मुक्त विद्यापीठाच्या वतीने हा पुरस्कार मिळत असल्याने विशाखाशी नाते जोडले गेल्याचे मनोगत यावेळी विशाखा पुरस्काराचे प्रथम मानकरी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
दुर्लक्षिलेल्या आणि उपेक्षित समाजाचा सन्मान
वैदू या अतिशय मागासलेल्या, दुर्लक्षिलेल्या आणि उपेक्षित समाजाचा सन्मान मुक्त विद्यापीठाने केला आहे, त्याबद्दल अभिमान वाटतो. विद्यापीठाने केलेल्या सन्मानाने मला समाजाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवता येतील, अशा भावना रुक्मिणी पुरस्कार विजेत्या दुर्गा गुडिलू यांनी व्यक्त केल्या.