मराठी साहित्यकृतींनाही नोबेल मिळू शकेलपृथ्वीराज तौर : येवल्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र; मान्यवरांच्या सहभागाने रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:00 AM2017-12-17T00:00:00+5:302017-12-17T00:19:57+5:30
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘भाषा, साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र झाले.
येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘भाषा, साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र झाले.
या चर्चासत्राचे उद्घाटन मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. गो. तु. पाटील यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाले. तर बीजभाषक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा आणि साहित्याचे अभ्यासक तथा अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर यांची उपस्थिती होती. हिंदीतील बीजभाषण मंठा जालना येथील हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉ. ज्ञानेश्वर महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. चर्चासत्राचे समन्वयक डॉ. धनराज धनगर यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका कथन केली. आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रा. गो.तु. पाटील यांनी अनुवादाची संकल्पना स्पष्ट करताना एका भाषेत व्यक्त झालेला आशय दुसºया भाषेत व्यक्त करणे म्हणजे अनुवाद एवढाच अनुवाद या शब्दाचा अर्थ नाही; तर एका भाषेतून त्याच भाषेत व्यक्त केले जाणारे भाष्य, क्लिष्ट विषयाचे केले जाणारे सुलभीकरण म्हणजेही अनुवाद असतो; भावार्थ, गोषवारा, सारांश हेदेखील अनुवादच असतात, अशी अनुवाद या विषयाची व्यापकता स्पष्ट केली. बीजभाषणात डॉ. पृथ्वीराज तौर यांनी एकभाषिक आस्वादकासाठी स्वभाषेतील साहित्य हे मोठ्या खोलीसारखे असते. इतर भाषांच्या अनुवादरूपी खिडक्यांमधून एक भाषिक आस्वादक या इतर भाषांच्या साहित्याचा आस्वाद घेत असतो; मात्र बहुभाषिकांसाठी इतर भाषेची खिडकी ही खिडकी न राहता ते दार बनते. बहुभाषिक व्यक्ती त्याला ज्ञात असणाºया साहित्याचा थेट आस्वाद घेऊ शकतो. तो एका खोलीतून दुसºया खोलीत प्रवेश करतो. एकभाषिकांसाठी असणाºया मर्यादा बहुभाषिकांसाठी नसतात, अशा लालित्यपूर्ण शैलीत बहुभाषिक असण्याचे महत्त्व डॉ. पृथ्वीराज तौर यांनी पटवून दिले. हिंदीतील बीजभाषक डॉ. ज्ञानेश्वर महाजन यांनी ‘‘अनुवाद की शुरु वात मां से होती है’’ असे सांगून अनुवादाची व्याप्ती व भावनिक गुंतवणूक याकडे लक्ष वेधले. सामान शब्दाचा अनुवाद केल्याने गुलजार यांना आपले अनुवादाचे पुस्तक परत घ्यावे लागले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी ‘मोट चालते मळ्यात माझ्या चाक वाजते कुईकुई’ अशा प्रादेशिक संस्कृतीतील शब्दांचे अनुवाद करणे अशक्य ठरते असे सांगून ‘अनुवादाच्या क्षेत्रातील आव्हाने’ यावर प्रकाश टाकला. या ओळींचे अनुवाद करण्यासाठी मोट, नाडा, पखाल या संकल्पनांचे अर्थ माहीत असणेदेखील आवश्यक ठरते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा गायकवाड यांनी केले. अतिथींचा परिचय चर्चासत्राचे सहसमन्वयक प्रा. कमलाकर गायकवाड यांनी करून दिला. आभार चर्चासत्राचे दुसरे सहसमन्वयक प्रा. रघुनाथ वाकळे यांनी मानले. चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य शिरीष नांदुर्डीकर, कार्यालयीन अधीक्षक बी. यू. अहिरे, प्रा. शिवाजी गायकवाड, प्रा. अरुण वनारसे, प्रा. पंढरीनाथ दिसागज, प्रा. हर्षल बच्छाव, प्रा. डी.के. कन्नोर, प्रा. बी.एल. शेलार, प्रा. सी.एन.हिरे, प्रा. डी. व्ही. सोनवणे, प्रा. टी.एस. सांगळे, ग्रंथपाल ए.पी. बागुल, लेखापाल भालचंद्र पेंढारकर तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज प्रा. डी.बी. मामुडे, प्रा. विठ्ठल सातपुते, प्रा. अमित सोनवणे तसेच सर्व शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.