मराठी साहित्यामधील व्यवहार मोकळा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:18 AM2018-10-23T01:18:57+5:302018-10-23T01:19:53+5:30
मराठी साहित्याच्या नवकथेच्या काळात सामाजिक प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांपेक्षा विशिष्ट वर्तुळातील साहित्यिकांच्याच साहित्याची चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे पीडितांच्या व्यथा मांडणा-या लेखकचे साहित्य उपेक्षित राहिल्याचे सांगतानाच मराठी साहित्यातील व्यवहार मोकळा आणि चांगला घडत नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
नाशिक : मराठी साहित्याच्या नवकथेच्या काळात सामाजिक प्रश्नांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांपेक्षा विशिष्ट वर्तुळातील साहित्यिकांच्याच साहित्याची चर्चा घडवून आणली गेली. त्यामुळे पीडितांच्या व्यथा मांडणा-या लेखकचे साहित्य उपेक्षित राहिल्याचे सांगतानाच मराठी साहित्यातील व्यवहार मोकळा आणि चांगला घडत नसल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. कुसुमाग्रज स्मारकात संवाद संस्थेच्या ३८व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र संवाद पुरस्कार, नीलवसंत संवाद पुरस्कार वितरणासह ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संवाद संस्थेचे अभिमन्यू सूर्यवंशी, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत महामिने, ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ, संतोष हुदलीकर, चैत्रा हुदलीकर आदी उपस्थित होते. डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, मराठी विश्वात सत्यशोधक साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. अभिरुची जपणारे धाडसी लेखकांची सध्या फारशी दखल घेतली जात नाही. ज्या साहित्यिकांनी जनमाणसाची जडणघडण केली आहे, अशा साहित्यिकांचा नव्याने लिहिणाºयांनी शोध घ्यायला हवा. साहित्य क्षेत्रातही भक्तवर्गाचा उदय होत असल्याने सामाजाची व्यथा मांडणारे साहित्य उपेक्षित राहते. साहित्यात चिकित्सेला, समीक्षेला महत्त्व असते. परंतु मराठी साहित्यात एका वर्गातील साहित्यिकांचा भक्तवर्ग वाढत पीडितांचे वंचितांचे जीवन मांडणारे महात्मा फुले यांच्यासह ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई यांच्यासारखे साहित्यिक उपेक्षित राहिल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी धाडसी व निर्भयपणे काम करणारे संपादक होते. परंतु, आता मीडिया भयावह स्थितीतून मार्गक्रमण करीत असल्याचे सांगतानाच माध्यमे ठराविक लोकांच्या हाती एकवटत चालल्याने समाजाचे दु:ख त्यातून उमटताना दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन सुरेखा बो-हाडे यांनी केले, आभार डॉ. किरण पिंगळे यांनी मानले.
महामिने, सराफ यांचा सत्कार
लेखक अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ या आत्मकथेला व कवी रावसाहेब कुवर यांच्या ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ या कविता संग्रहास चैत्रसंवाद पुरस्कार डॉ. श्रीकांत नरुले यांच्या ‘जगदीश खेबूडकरांच्या लावण्या’ या समीक्षेला नीलवसंत संवाद पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ व चंद्रकांत महामिने यांचा सन्मानपत्र देऊन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.