मराठी केवळ भाषा नव्हे, तर संस्कृती : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 01:47 AM2021-12-04T01:47:18+5:302021-12-04T01:47:45+5:30
मराठी भाषेचा विकास हा आपला सर्वांचाच ध्यास आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, शिक्षणातही मराठीला स्थान मिळावे असे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत. मराठी केवळ भाषा नाही, ती संस्कृती आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनात आपल्या भावना व्यक्त केल्या. नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले होते. परंतु, त्याऐवजी ठाकरे यांनी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देणारा संदेश पाठविला. त्याचे वाचन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
नाशिक : मराठी भाषेचा विकास हा आपला सर्वांचाच ध्यास आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, शिक्षणातही मराठीला स्थान मिळावे असे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत. मराठी केवळ भाषा नाही, ती संस्कृती आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनात आपल्या भावना व्यक्त केल्या. नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले होते. परंतु, त्याऐवजी ठाकरे यांनी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देणारा संदेश पाठविला. त्याचे वाचन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. त्यात ठाकरे यांनी म्हटले आहे की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असून, यंदाचे हे ९४ वे संमेलन नाशिकच्या पवित्र भूमीत आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नगरीत साहित्य संमेलन होत असल्याबद्दल विशेष आनंद आहे. जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट परतवून लावण्यासाठी साहित्य संमेलनाची ही सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी महत्त्वाची आणि मनाला उभारी देणारी ठरेल, असे सांगितले.
जगद्गुरू संत तुकोबारायांच्या ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जिवांचे जीवन’ या ओळींप्रमाणे हे अक्षरांचे अक्षय धन लुटण्यासाठी आपण दरवर्षी एकत्र येत असतो. या संमेलनाच्या संयोजनाचा मान दुसऱ्यांदा पटकाविणारे नाशिककर गोदाकाठचा हा मेळा संस्मरणीय करतीलच; पण या संमेलनातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसह, आपल्या लेखन प्रयोगांतून मराठीला आणखी समृद्ध, संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांना मानवंदना दिली जाईल. यातून मराठीतील विविध साहित्यिक प्रवाहांतील नव्या दमाच्या प्रतिभावंतांना प्रेरणा मिळेल. या सगळ्या प्रयत्नांतून नानाविध प्रतिभेचे, सर्जनशील असे अनेक लिहिते हात पुढे येतील अशी अपेक्षाही शेवटी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.