शासकीय विश्रामगृहात आता ‘मराठी नाट्यकर्मीं’ना विश्रामाची सुविधा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:52+5:302021-07-15T04:11:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शासकीय विश्रामगृहातील कक्ष आरक्षण ही केवळ मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, न्यायमूर्ती, शासकीय अधिकारी , ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शासकीय विश्रामगृहातील कक्ष आरक्षण ही केवळ मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, न्यायमूर्ती, शासकीय अधिकारी , अधिस्वीकृत धारक पत्रकार, मानाचे पुरस्कार सन्मान प्राप्त मान्यवर, खेळाडू यांचीच प्राधान्यक्रमात मक्तेदारी होती. मात्र, राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार यापुढील काळात मराठी नाट्यकर्मींना देखील शासकीय विश्रामगृहातील कक्षांच्या आरक्षण प्राधान्यक्रम यादीत समावेश करण्यात आला असल्याने त्यांनादेखील नियमानुसार कक्ष उपलब्ध होऊ शकणार आहेत.
मोठ्या शहरांमध्ये तसेच कोणत्याही जिल्ह्यातील खासगी हॉटेल्समध्ये रूमचे भाडे प्रचंड असते. त्यात पर्यटन, लग्नसोहळ्यांच्या काळात तर हॉटेल्सनी त्यांचे भाडेदेखील प्रचंड वाढवलेले असते. अशा परिस्थितीत कुणाही सामान्य व्यक्तीला किंवा रंगकर्मीला नीटनेटक्या, स्वच्छ हॉटेल्समध्ये राहण्यासाठी बुकिंग करणेदेखील अनेकदा आवाक्याबाहेरचे असते. अशा परिस्थितीत मग त्यांना शहराच्या मध्यवर्ती भागापासून लांब असलेल्या, गैरसोयीच्या हॉटेल्सचे बुकिंग तेदेखील अवास्तव भाडे देऊन करावे लागत होते. या मुद्द्यासह नाट्यक्षेत्राच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गत महिन्यात बैठक झाली होती. त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नाटकात काम करणारे ‘मराठी नाट्यकर्मी’ यांचा शासकीय विश्रामगृहातील कक्षबंधाचे आरक्षणासाठीच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत समावेश करण्यात आला असल्याचे शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
इन्फो
या आहेत अटी-शर्ती
शासकीय विश्रामगृहातील आरक्षणाचा लाभ केवळ विश्रामगृहाजवळील स्थानी असलेल्या नाटकाच्या प्रयोगात भाग घेण्यासाठी येणाऱ्या मराठी नाट्यकर्मींनाच घेता येईल. नाट्यप्रयोग नसतील किंवा नाट्यप्रयोग संपल्यानंतर खासगी व्यक्तीप्रमाणेच आरक्षण लाभ घेता येईल. अधिकाधिक केवळ सात दिवसांसाठी आरक्षण सुविधा, तसेच ताबा देण्यापूर्वी संपूर्ण कालावधीचे भाडे अनामत घेण्यात येईल. साध्या कक्षासाठी ५००, तर वातानुकूलित कक्षासाठी खासगी व्यक्तींना आकारल्या जाणाऱ्या भाड्याच्या निम्मे भाडे आकारण्याचे आदेश या शासकीय परिपत्रकात देण्यात आले आहेत.
इन्फो
प्राधान्यक्रमात शेवटून दुसरे स्थान
प्राधान्यक्रमात मराठी नाट्यकर्मींना आरक्षण देताना त्यांना शेवटून दुसरे स्थान देण्यात आले आहे. नवीन शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाची सुधारीत यादी देण्यात आली असून, त्यात १७ व्या स्थानावर रंगकर्मींना स्थान देण्यात आले असून त्यांच्यानंतर केवळ खासगी व्यक्तींचा अंतर्भाव आहे.
-----------
फोटो
शासकीय विश्रामगृह