Marathi Sahitya Sammelan: नारळीकर पिता-पुत्रांचा अनोखा योगायोग!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 10:11 AM2021-12-03T10:11:06+5:302021-12-03T10:11:34+5:30
Marathi Sahitya Sammelan: नाशिकचे संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, वैज्ञानिक होते. नाशिकमध्ये १९६९ साली पेठे विद्यालयात झालेल्या चौथ्या विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद रँग्लर नारळीकर यांनी भूषविले होते.
नाशिकचे संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, वैज्ञानिक होते. नाशिकमध्ये १९६९ साली पेठे विद्यालयात झालेल्या चौथ्या विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद रँग्लर नारळीकर यांनी भूषविले होते. तर नाशिकला आजपासून होणाऱ्या ९४व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान पहिले वैज्ञानिक साहित्यिक म्हणून मिळत असून हा एक अनोखा योगायोग रँग्लर नारळीकर आणि डॉ. नारळीकर यांचा जुळून आला आहे.
संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर यांचे वडील रँग्लर नारळीकर यांचे बालपणीचे शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यानंतर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सध्याच्या विज्ञान संस्थेतून ते १९२८ साली गणित विषय घेऊन बी.एस्सी. झाले. या परीक्षेत ९५.५ टक्के गुण मिळवून त्यांनी त्या काळात एक उच्चांक प्रस्थापित केला होता. केंब्रिजमधील परीक्षेत १९३० साली त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला आणि बी-स्टार रँग्लरचा बहुमान मिळविला. यामुळे त्यांना ‘टायसन’ पदक आणि ‘आयझॅक न्यूटन’ ही बहुमानाची, २५० पौंडांची शिष्यवृत्ती मिळाली. केंब्रिजमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर निबंध लिहावा लागे. नारळीकरांच्या निबंधाला ‘रॅले’ पारितोषिक देण्यात आले. हे पारितोषिक मिळविणारे ते पहिले भारतीय होते.
आयझॅक न्यूटन शिष्यवृत्तीतून नारळीकरांनी खगोलशास्त्रावर संशोधन केले. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदनमोहन मालवीय गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले असताना, त्यांनी केंब्रिज येथे जाऊन रँग्लर नारळीकरांची भेट घेऊन तेथील अभ्यास पूर्ण झाल्यावर बनारस विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून येण्याचे आमंत्रण दिले. केंब्रिजमधील अभ्यास संपल्यावर १९३२ साली ते बनारस विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. बनारस विद्यापीठात त्यांनी गणित विभाग प्रमुखपदाची जबाबदारी पार पाडली.