प्रमाणभाषेचा दुराग्रह सोडून सर्वसमावेशक झाल्यासच मराठी समृद्ध : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 01:53 AM2021-12-06T01:53:15+5:302021-12-06T01:53:47+5:30
बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात. भाषा पांडित्यप्रचुर, क्लिष्ट न राहता ओघवती होते. सध्याच्या संगणक इंटरनेटच्या जमान्यात ‘कॅची वर्ड’ ही संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले, तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल. त्यामुळे प्रमाण भाषेचा दुराग्रह सोडून स्थानिक बोलीभाषांबाबत मराठी सर्वसमावेशक झाली, तरच ती अधिक समृद्ध होईल, असे माझे ठाम मत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.
नाशिक : बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात. भाषा पांडित्यप्रचुर, क्लिष्ट न राहता ओघवती होते. सध्याच्या संगणक इंटरनेटच्या जमान्यात ‘कॅची वर्ड’ ही संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले, तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल. त्यामुळे प्रमाण भाषेचा दुराग्रह सोडून स्थानिक बोलीभाषांबाबत मराठी सर्वसमावेशक झाली, तरच ती अधिक समृद्ध होईल, असे माझे ठाम मत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.
कुसुमाग्रज नगरीत झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत गोडसे, कार्यवाह दादा गोऱ्हे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, पंकज भुजबळ, विश्वास ठाकूर, दीपक चंदे, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य प्रशांत पाटील, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, किरण समेळ, प्रतिभा सराफ, प्रशांत देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार यांनी नव्या पिढीतून आपल्याला रोबो घडवायचे नसून माणसे घडवायची असल्याचे सांगितले. त्यासाठी मराठी मन जपायला हवं आणि मातृभाषेतून जपलं जाऊ शकतं, असा माझा विश्वास असल्याचेही नमूद केले.
इन्फो
मराठीसाठी लवकरच बैठकीचे आयोजन
साहित्य संमेलनाला येण्यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करू शकतो, याची माहिती घेतल्याचे सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी असलेली कमतरता दूर करण्यासाठी किंवा काही दुरुस्त्या असतील, त्या दुरुस्त करण्यासाठी राज्यकर्ते म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी बैठक घेऊन जे करावे लागेल ते निश्चित करू, असे आश्वासन दिले.
इन्फो
सावरकरांनी मंदिरात पुजारी म्हणून दलिताची केली होती नियुक्ती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य चळवळीच्या योगदानावर चर्चाच होऊ शकत नाही. या चळवळीत त्यांचे योगदान, त्याग, सर्वस्व अर्पण करण्याची भूमिका, स्वातंत्र्याची चेतना पेटविणारे व शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचविणारे त्यांचे लिखाण पाहता मराठी भाषा ते कधीही विसरू शकणार नाही. असे असताना वाद कशासाठी? सावरकर हेदेखील विज्ञानवादीच होते. त्यांनी अयोग्य गोष्टींना विरोध केला. गाईंबद्दल सावरकरांचे विचार विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सावरकर रत्नागिरीत राहत होते. तेथे त्यांनी पतितपावन हे छोटे मंदिर बांधले व त्या मंदिराचा पुजारी म्हणून एका दलिताची नेमणूक केली. त्यामुळे सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान व त्यांचे विज्ञानवादी विचार पाहता, नाशिककर सावरकरांच्या नावाला विरोध करूच शकत नसल्याचेही पवार यांनी नमूद केले.